मुंबईवर पाणी संकट.. एप्रिल-मेमध्ये पाणीबाणीची समस्या ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019

- मुंबईची रोजची पाण्याची गरज - 4,200 दशलक्ष लिटर 
- सध्या होणारा पाणीपुरवठा - 3,900 दशलक्ष लिटर 
- पाणीचोरी व गळतीमुळे रोज वाया जाणारे पाणी - 800 ते 900 दशलक्ष लिटर 
- शहराला प्रत्यक्षात होणारा पुरवठा - 2,900 दशलक्ष लिटर 

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये गेल्या वर्षी वरुणराजा समाधानकारक बरसला नाही. त्यामुळे डिसेंबर 2018 पासून मुंबईकरांना 10 टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यात 31 जानेवारीला सर्व धरणांमध्ये केवळ सात लाख 14 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा अडीच लाख दशलक्ष लिटर कमी आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात मुंबईकरांना "पाणीबाणी'ला सामोरे जाण्याची शक्‍यता आहे. 

मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा, तानसा, विहार, तुळशी आणि अप्पर वैतरणा ही सात धरणे मुंबईकरांची तहान भागवितात. 2018 मध्ये या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे पालिकेला पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागला. सध्या या सातही धरणांमध्ये सात लाख 14 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी 1 फेब्रुवारीला या धरणांमध्ये नऊ लाख दशलक्ष लिटर साठा होता. 

धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा सात लाख दशलक्ष लिटर दिसत असला तरी काही प्रमाणात तो जमिनीखाली झिरपत असतो. त्यात या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात धरण क्षेत्रांत पाऊस समाधानकारक पडेल, हे आता सांगता येणार नाही. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी मार्चअखेरपर्यंत 10 टक्‍क्‍यांवरून 15 टक्के पाणीकपात करावी लागेल, अशी माहिती जल विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. 

- मुंबईची रोजची पाण्याची गरज - 4,200 दशलक्ष लिटर 
- सध्या होणारा पाणीपुरवठा - 3,900 दशलक्ष लिटर 
- पाणीचोरी व गळतीमुळे रोज वाया जाणारे पाणी - 800 ते 900 दशलक्ष लिटर 
- शहराला प्रत्यक्षात होणारा पुरवठा - 2,900 दशलक्ष लिटर 


संबंधित बातम्या

Saam TV Live