महाराष्ट्रात कॉंग्रेस मनसेला घेणार आघाडीत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 मे 2019

आघाडीचे नेते भाजपच्या वाटेवर; "मनसे' आघाडीत येण्याची शक्‍यता 
मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी विधानसभेच्या तोंडावर दोन्ही कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस आघाडीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

आघाडीचे नेते भाजपच्या वाटेवर; "मनसे' आघाडीत येण्याची शक्‍यता 
मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी विधानसभेच्या तोंडावर दोन्ही कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस आघाडीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या जागांचा आकडा कायम राखला आहे. मात्र कॉंग्रेसने एक जागा गमावली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस चार; तर कॉंग्रेस अवघ्या एका जागेवर निवडून आली आहे. ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने दोन्ही कॉंग्रेसच्या आठ ते दहा जागा पाडल्याचे स्पष्ट झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाव वधारलेल्या "वंचित'ला आघाडीत कसे सामावून घेतले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेससोबतची राजकीय गुलामगिरी संपुष्टात आल्याने विधानसभेसाठी आघाडी करावयाची असल्यास समसमान पातळीवर करावी, अशी आतापासूनच दमबाजी करण्यास सुरवात केली आहे. यामुळे आंबेडकर यांच्यासोबत बोलणी करताना दोन्ही कॉंग्रेसची दमछाक होण्याची शक्‍यता आहे. 

मनसे आघाडीत येणार 
लोकसभा निवडणुकीत आपला एकही उमेदवार उभा न करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारविरोधात प्रचारसभा घेत कॉंग्रेस आघाडीला फायदा करून दिला होता. लोकसभा निवडणुकीतच राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रस्ताव असताना कॉंग्रेसने त्यास विरोध केला होता, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले होते; तसेच विधानसभा निवडणुकीत राज यांना नक्‍कीच सोबत घेतले जाईल, अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणत्या आणि किती जागा देण्यात येतील, यावर चर्चा झाल्यानंतरच त्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

नेते भाजपच्या दिशेने 
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे आणि बहुजन वंचित आघाडीसोबत चर्चेच्या अडचणींना सोमोरे जावे लागणार असताना दोन्ही कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेसला सोडचिठी दिली असून, लवकरच ते युतीच्या मंत्रिमंडळात सामील होतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेते प्रवेश केला असून, त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्‍यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. माण-खटावचे कॉंग्रेस आमदार जयकुमार गोरे लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार करत होते; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनाही भाजपप्रवेशाचे वेध लागले आहेत. 

कॉंग्रेससोबतची राजकीय गुलामगिरी संपुष्टात आल्याने विधानसभेसाठी आघाडी करावयाची असल्यास समसमान पातळीवर करावी. 
- ऍड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष ः वंचित बहुजन आघाडी

Web Title: Vidhansabha Election 2019 Congress NCP MNS Aghadi Politics


संबंधित बातम्या

Saam TV Live