मराठी भाषा दिनानिमित्त पारिजात मुंबईकडून ‘गोष्ट मराठीची’ 

मराठी भाषा दिनानिमित्त पारिजात मुंबईकडून ‘गोष्ट मराठीची’ 

मुंबई : आज मराठी भाषा दिन. मराठी भाषेचा गौरव म्हणून आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.  तर पारिजात मुंबईतर्फे ‘गोष्ट मराठीची’या खास कार्यक्रमाद्वारे 
मराठी भाषेचा गौरव करण्यात आला.  या कार्यक्रमांतर्गत मागील शनिवारी नविनचंद्र मेहता इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड डेव्हलेपमेंट, दादर इथं शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘सांघिक मराठी कथा अभिवाचन’ स्पर्धा घेण्यात आली.  या स्पर्धेत मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे भागातील तब्बल 28 शाळांनी सहभाग घेतला.

‘सांघिक मराठी कथा अभिवाचन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा गोडवा रुजावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. या स्पर्धेत 28 शाळांमधून 180 विद्यार्थ्यांचे 50 संघ सहभागी झाले. तसंच शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते.  उमेश घळसासी,  उमाताई विसूभाऊ बापट, रश्मी आमडेकर, डॉ. शिरीष ठाकूर आणि सुमित भरत पवार यांनी स्पर्धेचं परिक्षण केलं. शिवाय नविनचंद्र मेहता इंस्टिट्यूट ॲाफ टेक्नॉलॉजी ॲन्ड डेव्हलपमेंट संसथेकडून स्पर्धेसाठी मोफत वर्ग आणि इतर गोष्टी उपलब्ध करून देण्यात आले. ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी पारिजातला काही पुस्तकं भेटस्वरूपात दिली. 

शालेय विद्यार्थ्यांसाठी अशी आगळीवेगळी अभिवाचनाची स्पर्धा पारिजाततर्फे संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्यांदा घेण्यात आली. स्पर्धेच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिकांचे कथासंग्रह आणि कादंबरींचं वाचन केलं. महाराष्ट्राची संस्कृती मुलांमध्ये रुजावी, त्यांच्यात मराठी साहित्याची आवड आणि मराठी भाषेबद्दल गोडी वाढावी, हा या उपक्रम राबवण्यामागे हेतू होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केलेल्या अस्खलित मराठी कथा अभिवाचनामुळे विद्यार्थ्यांचे पालकही भारावून गेले. कार्यक्रमानंतर समाधान व्यक्त करतांनाच पालकांनी पारिजात संस्थेचं मनापासून कौतुक केलं. विशेष म्हणजे आयसीएसई, सीबीएसई आणि एसएससी इंग्रजी शाळांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामुळे ही या स्पर्धेची सगळ्यात मोठी उपलब्धी असल्याचं परिजातने सांगितलंय.

उपक्रम दिनी आघाडीचे लेखक श्री. आशिष पाथरे यांनी लिहिलेली ‘मराठी भाषा प्रतिज्ञा’ही घेण्यात आली.  23 फेब्रुवारीला ‘सांघिक मराठी कथा अभिवाचन’स्पर्धेत विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आलं.   5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी अशा दोन गटात ही स्पर्धा झाली. पहिल्या गटात देवनार इथल्या कुमुद विद्यामंदिर आणि दुसऱ्या गटात नालासोपारा इथलं राजा शिवाजी विद्यालय या दोन शाळांनी प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि चषक देण्यात आलं.  अभिनेते प्रणव रावराणे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. प्रणव रावराणेंनी यावेळी प्रमुख पाहुणे पद भुषवण्याबरोबरच ‘झंपूची शाळा’ हे लघुनाट्य सादर केलं.

पारिजात मुंबईने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून मराठी भाषेचा गौरव तर झालाच, शिवाय चिमुकल्यांच्या मनावर मराठी भाषा बिंबवण्याचा एक सोज्वळ प्रयत्नही करण्यात आला.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com