राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

मुंबई-पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत असून, माढा या मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील, अशी जोरदार राजकीय चर्चा आज रंगली. लोकसभा लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून, अद्याप निर्णय घेतलेला नाही; पण विचार नक्‍कीच करेन, असे वक्‍तव्य करून शरद पवार यांनीही या चर्चेला अधिकच बळकटी दिली आहे. 

मुंबई-पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत असून, माढा या मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील, अशी जोरदार राजकीय चर्चा आज रंगली. लोकसभा लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून, अद्याप निर्णय घेतलेला नाही; पण विचार नक्‍कीच करेन, असे वक्‍तव्य करून शरद पवार यांनीही या चर्चेला अधिकच बळकटी दिली आहे. 

आगामी निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात आज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्री पवार यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. मी निवडणूक लढवावी, अशी पक्षातील सहकाऱ्यांची अपेक्षा आहे. त्यात विजयसिंह आणि अन्य काही मंडळींनी मी माढ्यातून लढावे, असे सुचविले आहे. परंतू, माझी इच्छा नाही. तरीही आम्ही तुमचे ऐकतो, त्यामुळे आता तुम्ही आमचे ऐकावे, असे सहकारी म्हणत आहे. त्यामुळे आता मी त्यांच्या अपेक्षेचा विचार करेन, असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी 2009 मध्येच निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेत राज्यसभेत जाण्याचे पसंत केले होते. बारामती हा लोकसभा मतदारसंघ सुप्रिया सुळे यांना सोडल्यानंतर त्यांनी माढा लोकसभेतून निवडणूक लढविली होती. त्यानतंर मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली. मोदी लाटेतही राष्ट्रवादीने या जागेवर विजय मिळवला होता.

आता आगामी लोकसभेसाठी मोहिते-पाटील यांच्याऐवजी निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नावाला राष्ट्रवादीतून पसंती मिळेल, असे सांगितले जात होते. देशमुख यांनीही मतदारसंघातला संपर्क वाढवला आहे. मात्र, त्यामुळे मोहिते-पाटील हे नाराज असल्याचे सांगितले जाते. विद्यमान खासदार मोहिते-पाटील यांना डावलून देशमुख यांना उमेदवारी देऊ नये, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. पक्षातील या अंतर्गत संभ्रमावस्थेवर तोडगा म्हणून थेट शरद पवार यांनीच माढा लोकसभेतून उभे राहावे, असा एक मतप्रवाह पक्षातील नेत्यांच्या समोर आल्याचे सांगितले जाते.

कोणत्याही परिस्थितीत माढा लोकसभा जिंकायची असेल, तर पक्षातील गटबाजीला आवर घातल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे थेट शरद पवार यांनाच माढामधून उमेदवारी द्यावी, यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत असल्याचे सूत्रांचे मत आहे. त्यामुळे शरद पवार यांनीही लोकसभा निवडणूक लढवायची, की नाही याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही; परंतु कार्यकर्त्यांची तशी इच्छा असल्याने त्याचा विचार नक्‍कीच करेन, अशी गुगली टाकत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला आहे.

Web Title: NCP president Sharad Pawar to contest again ?


संबंधित बातम्या

Saam TV Live