राज ठाकरेंनी मारला आडवा हात! पण कुणावर?

राज ठाकरेंनी मारला आडवा हात! पण कुणावर?

ठाणे : मिसळ म्हंटलं की गरमागरम तर्री... कुरकुरीत शेव... सोबतीला उसळ... आणि पाव... नुसत्या वर्णानेच जीभेला पाणी सुटलं. 
तर अशा या मिसळच्या नाना तऱ्हा शहरोशहरी गल्लोगल्ली नक्कीच प्रत्येकाच्या जीभेवर रेंगाळल्या असणार. काही शहरांना तर चक्क
मिसळवरुनच ओळखलं जातं. उदाहरणार्थ ठाण्याचंच घ्या ना..! तलावांचं शहर अशी ओळख असलेल्या ठाण्यात, मामलेदारची मिसळ न
ऐकलेला किंवा चाखलेला मनुष्य तसा नामनिराळाच.. तर अशा या मामलेदारची झणझणीत मिसळ चाखण्यासाठी कानाकोपऱ्यातून 
येत असतात.. 

याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेही अपवाद ठरले नाहीत... सध्या निवडणुकीच्या धामधुमीत राजसाहेब आपल्या उमेदवारांच्या
प्रचारासाठी घाम गाळतायत.. शहरोशहरी पळतायत...
अन् या घाईगर्दीत राजसाहेबांना थकवाही जाणवतो.. तशातच भूकही निश्चितच लागत असणार.. मग अशावेळी ठाणे परिसरात
फिरणाऱ्या मनसेअध्यक्षांना मामलेदारची आठवण झाली नसती
तर नवलच... कल्याण आणि ठाण्यामध्ये शब्दांचा मारा करुन दमलेल्या राजसाहेबांनी, मग आपल्या पोटातील भूक शमवण्यासाठी
अनपेक्षितपणे मामलेदार मिसळकडे मोर्चा वळवला... 
यावेळी त्यांनी आपला मुलगा अमित ठाकरे तसंच इतर सहकाऱ्यांनाही या झणझणीत मिसळीची चव चाखण्यास भाग पाडलं...
लाखोंच्या हृद्यस्थानी विराजमान असलेले राजसाहेब स्वत: मिसळ
खाण्यासाठी आल्याचं पाहून, मग काय उपस्थितांची तारांबळच उडाली.. जो तो आपापल्या परीने ठाकरे कुटुंब आणि सहकाऱ्यांची
बडदास्त राखण्यात मग्न झाला... 

थोडी वाट पाहिल्यानंतर टेबलवर आलेली वाफाळलेली मिसळ पाहून, सर्वांच्याच बाजू सरसावल्या त्या मिसळचा घास घेण्यासाठी. पण
ही आहे मामलेदारांची मिसळ, जिचा मामलाच काही और आहे.. 
मिसळीचा झणझणीत पणा ठाऊक नसलेल्या अमित ठाकरेंच्या तर पहिल्याच घासात नाका डोळी पाणी आलं.. लेकाची ही अवस्था
पाहून साहेबांमधील बाप जागा झाला, अन् तितक्याच आपुलकीने त्यांनी 
अमितची चौकशी केली... पाणी हवं का विचारलं... अमितनेही अगदी दिलखुलासपणे मिसळीचा ठसका पचवला... अन् राज ठाकरेंसह
सर्वांनी मिसळीचा मामला निपटवला... अन् तृप्तीची ढेकर देत, मुंबईतील
निवासस्थानाकडे प्रयाण केलं... 

दणदणीत भाषण केल्यानंतर झणझणीत मिसळचा तडका घेत राज ठाकरेंनी प्रचारा एक दिवस सुफळ संपूर्ण केला. 
आता येणाऱ्या दिवसांत राज ठाकरे मिसळ खातात की तांबड्या पांढऱ्यावर ताव मारणार?, यावर माध्यमांच्या कॅमेऱ्याची नजर नसली, 
तरच नवल.

Web Title: Raj Thackeray takes the taste of the misal with his son

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com