पावसामुळे वाहन मालक अडचणीत, मूषकांच्या खादाडीने वाढला खर्च

पावसामुळे वाहन मालक अडचणीत, मूषकांच्या खादाडीने वाढला खर्च

मुंबई - सोमवारी (ता. 1) रात्री धुवांधार पावसातून वाचल्याचा आनंद हजारो वाहनमालकांच्या चेहऱ्यांवर काही तासच टिकला. उपनगरात सर्व ठिकाणी पाणी भरल्याने त्या रात्री उंदरांनी वाहनांतच मुक्काम केला होता. या उंदरांनी रात्रीचे जेवण म्हणून वाहनांमधील कार्पेट, वायर आणि सीट कव्हरवरही ताव मारला. मूषकांच्या खादाडीमुळे वाहनांच्या मालकांना 40 ते 45 हजारांचा फटका बसणार आहे. मुंबईत किमान 100 ते 125 सर्व्हिस सेंटर असून, प्रत्येक ठिकाणी 18 ते 20 गाड्या उभ्या आहेत. गॅरेजमध्ये आलेल्या वाहनांची मोजणीच झालेली नाही. 

सोमवारच्या रात्री एका गाडीत दोनतीन उंदीर मुक्कामाला होते. मंगळवारी सकाळी पाऊस कमी झाल्यावर उंदरांनी बस्तान हलवले. उंदरांच्या पराक्रमापासून अनभिज्ञ असलेल्या मालकांनी प्रयत्न करूनही गाड्या सुरू होत नव्हत्या. वाहने कशीबशी सुरू करून सर्व्हिस सेंटरमध्ये नेल्यानंतर मूषकांचा पराक्रम पाहून मालकांनी डोक्‍यावर हात मारून घेतला. सर्व्हिस सेंटरमध्ये किमान 18 गाड्या उभ्या आहेत. जागा नसल्यामुळे सातआठ गाड्या वेटिंगवर ठेवल्या, असे रवी ऑटोमोबाईल सर्व्हिसचे रवी शिंदे यांनी सांगितले. 

उंदरांनी वायर कुरतडल्याचे प्रकार चारपाच वाहनांत आढळले. तारा कुरतडल्यामुळे इलेक्‍ट्रिक पॅनलमध्ये बिघाड होतो. गाडी पाण्यात राहिल्यामुळे स्टेअरिंग सस्पेन्शनमध्ये बिघाड होतो. इंजिनाच्या सिलिंडरमध्ये पाणी गेल्यास तर मोठा बिघाड होतो. या प्रत्येक गाडीचे किमान 40 हजारांचे काम निघेल असे शिंदे म्हणाले. शिवडी येथील फोक्‍सवॅगन सर्व्हिस सेंटरमध्येही अशीच परिस्थिती आहे. तेथेही 17 ते 18 गाड्या सर्व्हिसिंगसाठी आल्या आहेत. त्यापैकी पाच ते सहा वाहनांना उंदरांचा फटका बसला आहे. आणखी काही गाड्या वेटिंगवर आहेत, असे व्यवस्थापक अशपाक शेख यांनी सांगितले. 

बिघाडाचे स्वरूप 
- वायर कुरतडल्या. 
- वायपर टॅंक, बोनेटच्या आतील हीट शिल्डचे नुकसान. 
- पाणी साचल्यामुळे इलेक्‍ट्रिक पॅनल "शॉर्ट'. 
- स्टेअरिंगच्या सस्पेन्शनमध्ये बिघाड. 
- इंजिनाच्या सिलिंडरमध्ये पाणी. 
- पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंगमध्ये बिघाड. 
- बॅटरीत पाणी शिरले. 
- एअर बॅगमध्ये बिघाड. 

विम्यासाठी प्रतीक्षा 
प्रत्येक वाहनाच्या दुरुस्तीसाठी 40 ते 42 हजार रुपये खर्च येणार आहे. बिघाड जास्त असल्यास हा खर्च लाखाच्या घरात जाऊ शकतो. त्यामुळे अनेक वाहनमालक विम्याचा दावा करण्याच्या प्रयत्नात आहेत. हा दावा स्वीकारला जाईपर्यंत "वेटिंग' वाढणार आहे. 

दोन लाख 69 हजार उंदरांचा संहार 
उंदरांमुळे लेप्टोस्पायरोसिस आणि इतर आजार होण्याचा धोका असतो. त्यांच्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने मूषकनाशक नेमले आहेत. विषप्रयोग व रासायनिक गोळ्यांचा वापर करूनही उंदीर मारले जातात. मुंबईत जानेवारी ते जूनच्या अखेरपर्यंत दोन लाख 69 हजार उंदरांचा संहार करण्यात आला. जूनमध्येच 46 हजार 983 उंदीर मारण्यात आले. 

Web Title: Rat menace in Mumbai during rainfall

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com