आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्व करतील : संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 जून 2019

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप, सत्ता आल्यावर न्याय वाटा आणि मुख्यमंत्री भाजपचा होणार की शिवसेनेचा, यावर कोणतीही चर्चा किंवा घोषणा झाली नसताना शिवसेना नेत्यांना मात्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे डोहाळे लागले आहेत. या संदर्भात खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप, सत्ता आल्यावर न्याय वाटा आणि मुख्यमंत्री भाजपचा होणार की शिवसेनेचा, यावर कोणतीही चर्चा किंवा घोषणा झाली नसताना शिवसेना नेत्यांना मात्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे डोहाळे लागले आहेत. या संदर्भात खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा गुरुवारी २९ वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने आदित्य ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे मंत्री, आणि नेत्यांची आज रीघ लागली होती. खासदार संजय राऊत यांनी ‘महाराष्ट्र खरंच तुझी वाट पाहत आहे,’ असे फेसबुकवर पोस्ट करत आदित्य ठाकरे यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या या शुभेच्छानंतर राजकारणात आदित्य ठाकरेंच्या विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

उपमुख्यमंत्री हे आदित्य ठाकरेंसाठी लहान पद आहे. तरुणांचे नेते म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी तरुणांमध्ये आकर्षण आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्व करतील अशा घडामोडी, जडणघडण सध्या सुरू आहे.
- संजय राऊत, शिवसेना नेते

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, ते चांगले काम करतील.
- मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री

आदित्य यांचे मौन
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रिपद मिळण्यासाठी शिवसेनेने चंग बांधला असला, तरी या प्रश्‍नावर काहीही बोलण्यास आदित्य यांनी नकार दिला. दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे गुण देण्याच्या मागणीसाठी आदित्य यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या संदर्भातील माहिती देण्यासाठी त्यांनी ‘मातोश्री’वर पत्रकार परिषद घेतली.

आपण विधानसभा निवडणूक लढविणार का, तसेच मुख्यमंत्री होण्याची आपली महत्त्वाकांक्षा आहे किंवा नाही असे प्रश्‍न विचारले असता आदित्य यांनी या संदर्भात बोलणे टाळले. मात्र, माझ्या हातून चांगले काम व्हावे असेच आपण वागत असतो, असे ते म्हणाले.

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षेच्या गुणांबाबत निर्माण झालेल्या प्रश्‍नावर फडणवीस यांच्याशी आपली सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आदित्य यांनी सांगितले. पुढील वर्षीपासून विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे गुण मिळतील, असा निर्णय झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळ आणि एसएससी या दोन मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी काल सकारात्मक बैठक झाल्याचे सांगताना ते म्हणाले, की दुष्काळी भागात पीकविम्याच्या तांत्रिक गडबडींवर लक्ष देण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रोजगार हमीच्या कामांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Sanjay Raut FB post Aditya Maharashtra is really waiting for you


संबंधित बातम्या

Saam TV Live