VIDEO | ठरलं? मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

मुंबई : शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी अडिच वर्षे उपमुख्यमंत्रीपदे असा फॉर्म्युला प्रस्तावित महाशिवआघाडीत तयार होत असल्याचे समजते. मुख्यमंत्रीपदासाठीच शिवसेनेने भाजपसोबत थेट पंगा घेतला आहे. महाशिवआघाडीच्या रुपाने शिवसेनेचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 

मुंबई : शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी अडिच वर्षे उपमुख्यमंत्रीपदे असा फॉर्म्युला प्रस्तावित महाशिवआघाडीत तयार होत असल्याचे समजते. मुख्यमंत्रीपदासाठीच शिवसेनेने भाजपसोबत थेट पंगा घेतला आहे. महाशिवआघाडीच्या रुपाने शिवसेनेचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 

याबद्दल अधिकृत पातळीवर तिन्हीपैकी एकाही पक्षाचा नेता बोलत नाही आहे. मात्र, महाशिवआघाडीत सत्ता वाटपाचे विविध पर्याय विचारात घेतले जात असल्याचे समजते. त्यामध्ये शिवसेनेला पूर्ण टर्म मुख्यमंत्रीपद देण्याचा पर्याय आहे. 

महाशिवआघाडीची पहिली एकत्रित बैठक गुरूवारी संध्याकाळी झाली. त्यामध्ये समान किमान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला. या मसुद्यावर तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाचे एकमत झाल्यानंतर राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. 

समान किमान कार्यक्रमापाठोपाठ संभाव्य मंत्रीमंडळात आणि खाते वाटप हे दोन प्रमुख मुद्दे प्रस्तावित महाशिवआघाडीसमोर आहेत. राजकीय वर्तुळातील माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत अधिक जागा जिंकणाऱया शिवसेनेकडे सर्वाधिक मंत्रीपदे जातील. त्याखालोखाल राष्ट्रवादीकडे आणि त्यानंतर काँग्रेसकडे मंत्रीपदे असतील. अपक्ष अथवा अन्य सहकारी पक्षांना मंत्रीपदांचा अथवा महामंडळांचा प्रस्तावही विचाराधीन आहे. 

मंत्रीमंडळातील सदस्यांची संख्या 42 असण्यावर घटनात्मक बंधन आहे. विधानसभा सदस्यांच्या एकूण संख्येच्या 15 टक्के सदस्य मंत्रीमंडळात असू शकतात. त्यामुळे या 42 सदस्यांची निवड करण्यावर येत्या दोन दिवसांत महाशिवआघाडीचा भर राहील, अशी चिन्हे आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. निवडणुकीपूर्वी युती म्हणून लढलेल्या भाजप-शिवसेनेत निकालानंतर बेवनाव झाल्यामुळे महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ शकली नाही. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू आहे. राष्ट्रपती राजवटीची वेळ महाराष्ट्रावर तिसऱयांदा आली आहे.  

Web Title: Speculations about political situation in Maharashtra viz via Shivsena NCP and Congress


संबंधित बातम्या

Saam TV Live