travel blog | चला करुया भारतातल्या स्कॉटलंडची सफर

हर्षदा कोतवाल
सोमवार, 2 डिसेंबर 2019

फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी आणि स्कॉटलंडला फिरायला जाण्याची इच्छा  बाळगणार्यांसाठी...  स्कॉटलंडच्या निसर्गाचे नयनरम्य दृश्य पाहण्याची संधी  भारतातच असल्याची माहिती हर्षदा कोतवाल यांनी ब्लॉगमधून दिली .

पहिला पूर्ण दिवस प्रवासात गेला. इकडे मेघालयात चार  नाही वाजले तर सूर्यदेव गायब होतात. पाच वाजता असं अंधारून येतं जणू 8-9 वाजलेत. गुवाहाटी वरून मेघालायचा प्रवास मोठा पण मस्त होता. इथलं NH 37 म्हणजे अजब प्रकरण, इथे एकाच हायवेवर रस्त्याच्या डावीकडे आसाम तर उजवीकडे मेघालय आहे. फक्त एका डीव्हायडर वरून गेलं की पोहोचलो दुसऱ्या राज्यात.   

रात्री 6 च्या दरम्यान (इथं संध्याकाळ असते का?) आम्ही शेनोंपेडेंग ला पोहोचलो. हँगिंग ब्रिज वरून जीव मुठीत धरून कॅम्पसाईटवर गेलो. याच ब्रिजवरून सकाळी जाम मजा येणारे हे नक्की होतं. कॅम्पसाईटवर पोहोचलो तर दावकी नदीचा आवाज आणि रातकिड्यांची किरssss सोडली तर काहीच ऐकू येत नव्हतं. थंडी प्रचंड वाढली होती म्हणून शेकोटी करून बसलो. शेकोटिभोवती बसलो की आपण माणसांना ओळखायला सुरवात करतो असं मला वाटतं. यावेळी आम्ही फक्त 5 मुली आहोत, त्यातल्या दोन माझ्यासाठी अनोळखी. इथं या शेकोटिशेजारीच बसून आम्ही एकमेकांना किस्से सांगितले आणि इथेच आम्ही एकमेकांवर पुढील सात दिवसांसाठी विश्वास ठेवला. लोकल पद्धतीनं केलेलं चिकन वरपून आम्ही स्लीपिंगबॅग मध्ये घुसलो. सकाळी डोळ्यांना जी पर्वणी मिळणार होती त्याचा विचार मी करत झोपून गेले.

Image may contain: fire and night

सकाळी पाच वाजता उठले आणि टेंट उघडून बाहेर नजर टाकली आणि मी वेडीच झाले. माझ्या नजरेसमोर जे सादर होत होतं त्याला कशाचीच तोड नव्हती. खळखळ आवाज करत वाहणारी दावकी आणि समोर खास सूर्योदय. काल सूर्य जेवढा लवकर रुसला तेवढंच लवकर आज स्वागतलाही आला. काल ज्या ब्रिज वरून आलो तोच समोर दिसत होता आणि च्यायला! याला तर काही आधारच नाहीये. जाताना परत यावरूनच जायचयं हा विचार केला आणि माझी वाट लागली. 

Image may contain: outdoor

नाश्ता झाला आणि आम्ही कॅम्पसाईट सोडली. त्या ब्रिज वरून जाताना दावकीचा काय भारी व्ह्यू मिळाला कसं सांगू? ब्रिज खूप हालत होताच पण थांबून फोटो काढण्याचा मोह आवरणार तरी कसा. ब्रिज वरून खाली दावकीच्या तळाला काय आहे हेही दिसत होतं आणि तेही अगदी स्पष्ट. कसलं भारी वाटतं होतं त्या ब्रिज वरून चालत जायला कसं सांगू? 

Image may contain: sky, bridge and outdoor

क्रांगसुरी वॉटरफॉल्स
चार पाच वर्षांपूर्वी जेव्हा देवकुंडची पुणे मुंबईमध्ये वेड्यासारखी क्रेझ होती तेव्हा जसे देवकुंडचे फोटो व्हायरल व्हायचे त्याहून हजारपटीने भारी आणि स्वच्छ पाण्याच्या क्रांगसुरी वॉटरफॉल्सला आम्ही गेलो. पहिल्या नजरेत त्याच्या प्रेमात पडले मी. त्याला पाहून आनंद बक्षिंचं एकच गाणं डोक्यात आलं आणि एकदम किक बसली, "मैने तुमको आते देखा, अपनी जान को जाते देखा." जशी मी त्याच्या जवळ जात गेले माझा मेंदू काम करेना झाला, तो म्हणत होता इथं फक्त डोळ्यांचे काम आहे, आपण गप बसावं. ते निळशार पाणी एवढं स्वच्छ होतं की काय सांगू. सगळ्यात भारी म्हणजे इथे तुम्हाला कपडे बदलण्यासाठी छोट्या खोल्यांचीही सोय आहे. तसेच ज्यांना पोहता येत नाही त्यांना इथे लाईफ जॅकेटही दिले जातात. एण्ट्री फी फक्त 50 रुपये आणि या 50 रुपयांत मला स्वर्ग गवसला होता.

Image may contain: outdoor, water and nature

दावकी रिव्हर
भारतातील सर्वांत स्वच्छ नदी अशी जिची ओळख आहे ती ही दावकी. पाणी कितीही खोल असुदे इथे पाण्याचा तळ स्पष्ट दिसतो हो, अगदी स्पष्ट. या नदीच्या शांत वातावरणात, पाण्याच्या खळखळ आवाजात लाकडाच्या छोट्याशा बोटीत फिरून आलो आणि मन तृप्त झालं. त्यानंतर आम्ही भारतातील सर्वात स्वच्छ गावात मोलोनोंग मध्ये जाऊन आलो. रात्री एका छोट्याशा पण गोंडस होमे स्टे मध्ये येऊन राहिलो. 

Image may contain: outdoor, nature and water

आता दुसऱ्या दिवशी आणखी मजा येणार हे नक्की होतं, कारण आम्ही भारतातल्या सर्वात भयानक ट्रेकला जाणार होतो. बघुया काय होतात ते...

Web Title: Travel blog of Meghalaya by Harshada Kotwal


संबंधित बातम्या

Saam TV Live