शहीद पतीला पत्नीने अर्पण केली अनोखी श्रद्धांजली

शहीद पतीला पत्नीने अर्पण केली अनोखी श्रद्धांजली

मुंबई - 'मला माझ्या पतीला अभिमान वाटेल असे काहीतरी करायचे होतं. एका जागी बसून रडणे मला शक्य नव्हते. त्यांनी नेहमी मला आनंदी आणि हसताना पहायचे होते. यामुळेच मी लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला. मी त्यांचा गणवेश परिधान करणार आहे. तो आमचा गणवेश असेल. मी सैन्यात दाखल होतेय, हीच माझ्या पतीला श्रद्धांजली असेल, असे हुतात्मा मेजर प्रसाद महाडिक यांच्या पत्नी गौरी महाडिक यांनी सांगितले.

अरुणाचल प्रदेशमधील इंडो-चायना सीमेवर तवांग येथे 2017 मध्ये मेजर प्रसाद महाडिक हुतात्मा झाले होते. आपल्या पतीला गमावल्यानंतरही गौरी यांनी सैन्यात भरती होण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. मी, लवकरच सैन्यात रुजू होत असून त्यानंतर, मी लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक असेल, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले. गौरी यांनी सैन्यातील लेफ्टनंट पदासाठीच्या दोन परीक्षा पास केल्या आहेत.

गौरी महाडिक म्हणाल्या, 'मी, एक वकिल असून एका कंपनीत चांगल्या पदावर काम करत होते. माझ्याकडे एक चांगली नोकरी होती, पण पतीच्या मृत्यूनंतर मी नोकरी सोडली आणि लष्करात भरती होण्यासाठी तयारी करु लागले. माझ्या पतीला श्रद्धांजली देण्यासाठी मी लष्करात भरती होणार आहे. भरती झाल्यानंतर मला जो गणवेश मिळेल तो फक्त माझा एकटीचा नसणार आहे तर आम्हा दोघांचा असेल. मला माझ्या पतीला अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं होतं. एका जागी बसून रडणं मला शक्य नव्हतं. त्यांनी नेहमी मला आनंदी आणि हसताना पहायचं होतं. यामुळेच मी लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला आहे.'

दरम्यान, देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानाच्या पत्नीचे हे बोल देशातील लक्षावधी मुलींना प्रेरणा देणार आहेत. तर वीरमाता आणि वीरपत्नींचे धैर्य वाढवणार आहेत. गौरी आणि मेजर प्रसाद यांचा 2015 मध्ये विवाह झाला होता. विरारमध्य ते आपल्या कुटुंबासोबत राहत होते. गौरी महाडीक यांनी दुसऱ्या प्रयत्नात सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची (एसएसबी) परिक्षा यशस्वीपणे पार पाडली आहे. यावेळी त्यांच्यासोबत 16 उमेदवार होते. गौरी यांनी पहिला क्रमांक मिळवत परिक्षा उत्तीर्ण केली आहे. चेन्नई येथे एप्रिल महिन्यात त्या रुजू होतील. यावेळी त्यांना 49 आठवडे प्रशिक्षण दिले जाईल. एक वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना लष्करात लेफ्टनंट पदावर रुजू करण्यात येईल.

Web Title: wife of major prasad mahadik gauri mahadik to join army as a tribute to husband

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com