सबवेमध्ये पाणी,चारचाकी अडकल्यामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 जुलै 2019

मुंबई : मालाड परिसरात रेल्वेमार्गाखालील सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यात सोमवारी रात्री चारचाकी अडकल्यामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. इरफान खान व गुलशन शेख अशी मृतांची नावे आहेत. रेल्वेमार्गाखालील सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यामुळे त्यांची गाडी बंद पडली. इंजिन बंद पडल्यामुळे आणि पाण्याच्या दाबामुळे गाडीची दारे उघडेनाशी झाली. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांनी कुटुंबीयांना मोबाईलवरून कल्पना दिली. त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, पाऊस वाढल्यामुळे त्यांना गाडीपर्यंत जाणे कठीण झाले होते.

मुंबई : मालाड परिसरात रेल्वेमार्गाखालील सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यात सोमवारी रात्री चारचाकी अडकल्यामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. इरफान खान व गुलशन शेख अशी मृतांची नावे आहेत. रेल्वेमार्गाखालील सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यामुळे त्यांची गाडी बंद पडली. इंजिन बंद पडल्यामुळे आणि पाण्याच्या दाबामुळे गाडीची दारे उघडेनाशी झाली. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांनी कुटुंबीयांना मोबाईलवरून कल्पना दिली. त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, पाऊस वाढल्यामुळे त्यांना गाडीपर्यंत जाणे कठीण झाले होते. अखेर अग्निशामक दलातील जवानांनी दोरी बांधून गाडी पाण्यातून ओढून काढली. इरफान आणि गुलशन यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

मुंबई, पुणे - मुंबई, पुणे, नाशिक, कल्याणमध्ये सोमवारी रात्रीपासून पडलेल्या तुफानी पावसाने ३८ जणांचा बळी घेतला. मालाडला झोपड्यांवर भिंत कोसळून २१ जण, तर मालाड सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यात मोटार बंद पडून त्यातील दोन जण मरण पावले. कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील वेणूताई चव्हाण तंत्रनिकेतनची सीमाभिंत कोसळली आणि त्याखाली चिरडून ६ जणांचा मृत्यू झाला आणि ४ जण जखमी झाले. 

मालाड टेकडीवरील जलाशय (रिझव्हॉयर) संकुलाची भिंत तेथील आंबेडकरनगर व पिंपरीपाडा येथील झोपड्यांवर कोसळल्याने २१ जण मृत्युमुखी, तर ७८ जखमी झाले. घटना सोमवारी मध्यरात्री १२.४५च्या सुमारास घडली. तसेच मालाड परिसरातच सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यात चारचाकी अडकल्यामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. मुलुंड येथेही गृहनिर्माण संकुलाची भिंत कोसळून तेथील सुरक्षारक्षक ठार झाला आणि विलेपार्ले येथे एका व्यक्तीचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. 

रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरून पाण्याच्या लोंढ्याचा दाब आल्याने मालाडमधील भिंत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही भिंत दोनच वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. ही भिंत कोसळण्यापूर्वी मुसळधार पावसाचे पाणी झोपड्यांमध्ये शिरल्याने परिसरातील अनेक रहिवासी जागेच होते. 

घटनेच्या काही मिनिटे आधी या भिंतीतून आवाज येऊ लागल्याने सावध झालेले काही रहिवासी सुरक्षित ठिकाणी गेले; ज्यांना शक्‍य झाले नाही ते या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. सर्वच रहिवासी गाढ झोपेत असते, तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता होती.

गोरेगाव व मालाडच्या मधोमध पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगररांगांच्या कडेला पिंपरीपाडा झोपडपट्टी आहे. ही झोपडपट्टी संपून टेकडी सुरू होते. तेथे १५-२० फूट उंच व एक फूट रुंद, किमान दोन किलोमीटर लांब

सिमेंट काँक्रीटची भिंत 
बांधण्यात आली आहे. या भिंतीपलीकडील डोंगरात जलाशय आहे. या डोंगर उतारावरून वेगात आलेले पाणी रस्त्याशेजारील भिंतीशी अडून राहिले. त्या दाबाने भिंतीचा किमान शंभर-सव्वाशे फुटांचा भाग लागूनच असलेल्या झोपड्यांवर कोसळला. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या २०-३० घरांमधील रहिवाशांना बचावाची संधीच मिळाली नाही.

भिंत पडताच तिच्यामागे अडलेला पाच फूट उंच पाण्याचा लोंढा वेगाने या झोपड्यांवरून गेला. त्यात अनेक कच्ची घरे कोलमडून पडली. त्यातील सामान, पाण्याने भरलेली पिंपे, सिलिंडर, कपाटे, शोकेस, दुचाकी इकडे-तिकडे फेकल्या गेल्या. 

भिंतीच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह 
दोन वर्षांपूर्वी येथे तीन टप्प्यांची दगडी भिंत होती, ती चांगली होती. मात्र, ही नवी भिंत कच्ची असल्याचा दावा रहिवाशांनी केला. या भिंतीचा पायादेखील व्यवस्थित नव्हता, अशीही चर्चा तेथे होती. 

शाळेची भिंत ढासळली
मुसळधार पावसामुळे कल्याणमधील दुर्गाडी किल्ला परिसरातील नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळून तीन जणांचा बळी गेला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. मृतांमध्ये एका लहानग्याचा समावेश आहे. शाळेच्या बाजूने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. भिंतीचा काही भाग शेजारील दोन घरांवर पडल्याने ढिगाऱ्याखाली लोक अडकले होते. स्थानिक नागरिक, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. मात्र, यात तिघांचा मृत्यू झाला. शोभा कांबळे (वय ६०), करीना चांद (वय २५), हुसेन महंमद (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. 

अनधिकृत बांधकामे व भूमाफिया
ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथे ऐतिहासिक भटाळे तलाव 
असून, त्यावर मातीचा भर टाकून या ठिकाणी भूमाफियांनी जागा बळकाविल्या आहेत. या परिसरात अनेक अनधिकृत झोपड्या असून, शाळेच्या भोवतीही अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्याने डोके वर काढले आहे.

भिंतीचा कडकड आवाज येऊ लागल्यावर आम्ही जमेल तितक्‍या लोकांना सावध केले व सगळे भिंतीपासून लांब पळू लागलो. पण, भिंत पडल्यावर जोरदार पाण्याचा लोंढा आला व आम्ही सर्वजण सामानासह इकडेतिकडे फेकले गेलो.
- यशवंत गावणूक, रहिवासी 

महिन्यातील ‘पर्जन्यबळी’
कोकण - २३
पुणे - १८
नाशिक - ८
औरंगाबाद - ४
अमरावती - १०
अमरावती - १०
एकूण मनुष्यहानी - ६७
दगावलेली जनावरे - ४७
(संदर्भ ः आपत्ती व पूरनियंत्रण विभागाकडील १ जून ते १ जुलै २०१९ कालावधीतील माहिती.)

 

Web Title: Mumbai Wall Collapse Accident 21 Death Rain Water

 


संबंधित बातम्या

Saam TV Live