मुंबईला जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 मे 2019

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी साठा आहे. तो जुलैपर्यंत पुरेल, अशी ग्वाही महापालिकेच्या जल अभियंता विभागाने शुक्रवारी (ता. ३) स्थायी समितीत दिली.

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी साठा आहे. तो जुलैपर्यंत पुरेल, अशी ग्वाही महापालिकेच्या जल अभियंता विभागाने शुक्रवारी (ता. ३) स्थायी समितीत दिली.

परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे यंदा मुंबईतील सर्व तलावांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईवर पाणीटंचाईची टांगती तलवार आहे. मुंबईतील संभाव्य पाणीसंकटाबाबत नगरसेवकांनी शुक्रवारी स्थायी समितीत चिंता व्यक्त केली. सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता पाऊस पडेपर्यंत प्रशासनाने कोणती उपाययोजना केली, अशी विचारणा भाजपचे अभिजित सामंत यांनी केली. 

कुलाब्यातील नगरसेविका सुजाता सानप यांनी फोर्ट परिसरात नळाला येत असलेल्या दुर्गंधीयुक्त गढूळ पाण्याची छायाचित्रे सभागृहात सादर केली. अधिकारी अशाप्रकारचे पाणी पितील का, असा सवाल त्यांनी केला. दीड वर्षांपासून मागणी करूनही कुलाब्यातील प्रभाग क्रमांक २२५ मध्ये सहायक अभियंत्याची नेमणूक झालेली नाही. अशा स्थितीत नागरिकांनी समस्यांचे निराकरण कोणाकडून करून घ्यायचे, असा प्रश्‍न त्यांनी केला. पालिकेकडे दीर्घकालीन उपाययोजना नसल्यामुळे टॅंकरमाफियांचे फावले आहे. सध्या १० टक्के पाणीकपात जाहीर झाली अाहे. तरी प्रत्यक्षात ५० टक्के कपात सुरू आहे. पर्जन्यजल संधारण आकड्यांचा खेळ झाला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. नगरसेवक शरद कोरगावकर यांनी त्यांच्या प्रभागातील डोंगराळ भागातील पाणीपुरवठ्याच्या व्यथा मांडल्या. बुजलेल्या विहिरी आणि बंद पडलेल्या विंधन विहिरी दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली. 

राखीव पाणीसाठ्यासाठी साकडे
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत मागील वर्षी ३ मे रोजी चार लाख २७ हजार ७७७ दशलक्ष लिटर साठा होता. या वर्षी ३ मे रोजीचा पाणीसाठा फक्त दोन लाख ४३ हजार ५१ दशलक्ष लिटर आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा १७ टक्‍क्‍यांनी कमी आहे, असे महापालिकेचे मुख्य जल अभियंता अशोककुमार तवाडिया यांनी सांगितले. पाणीसंकट लक्षात घेऊन राज्य सरकारकडून राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी तलावांत उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Water to Mumbai till July


संबंधित बातम्या

Saam TV Live