राष्ट्रवादी, शिवसेनेचा इस्लामपूर पालिकेच्या सभेवर बहिष्कार

राष्ट्रवादी, शिवसेनेचा इस्लामपूर पालिकेच्या सभेवर बहिष्कार

इस्लामपूर ( सांगली ) - येथील नगरपालिकेची आजची सभा कोरमअभावी रद्द करण्यात आली. सत्ताधारी घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहात न जाता पालिकेच्या आवारात 'टाईमपास' करणे पसंत केले. सभा रद्द करण्याच्या नामुष्कीची ही दुसरी वेळ आहे.

साडे अकरा वाजता सभा सुरू होणार होती. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार - पवार वेळेत हजर होते. शिवाय वैभव पवार, कोमल बनसोडे, मंगल शिंगण हे तीनच नगरसेवक हजर होते. त्यामुळे सभा रद्दचा निर्णय घेण्यात आला. विकास आघाडीचे अध्यक्ष पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनीही सभेला दांडी मारली. 

हे विषय सभेत ठरणार होते वादग्रस्त
आजच्या सभेत लेखापरीक्षण अहवालाची दखल घेणे, न्यायालयात दाखल केलेले रिट पिटीशन, मंजूर विकास योजनेतील रि. स. नं. १२ मधील बगीचा व यात्रा मैदानाचे आरक्षण रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करणे, कलम ३७ नुसार आरक्षणातून रस्ता वगळणे याशिवाय शासनाची परवानगी न घेता म्हाडाला हस्तांतरित केलेल्या जमिनीचा व्यवहार रद्द करणे, मालमत्ता हस्तांतरण आकारणीबाबत फेरविचार करणे हे विषय वादग्रस्त ठरण्याची शक्यता होती. त्यामुळेच राष्ट्रवादी व शिवसेनेने सभा होऊ न देण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.

विकासकामांवर  परिणाम नाही
"स्वच्छता अभियान, मागासवर्गीय समिती याशिवाय काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आजची सभा होणे आवश्यक होते. अनेक कामे प्रलंबित आहेत, त्यावर निर्णय अपेक्षित होते. ही सभा रद्द झाल्याचा कोणताही परिणाम शहरातील विकासकामांवर होणार नाही. राज्य शासनाच्या नव्या कायद्यानुसार सभा अशी रद्द झाल्यास नगराध्यक्षांना आपसूकच महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्याचे काही अधिकार मिळतात, त्यानुसार निर्णय घेतले जातील."
- निशिकांत पाटील, नगराध्यक्ष

अकार्यक्षम नगराध्यक्षांमुळेच बहिष्कार
"शहरात मनमानी कारभार सुरू आहे. नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आम्ही नाराज आहोत. नगरसेवकांना विश्वासात न घेता काम सुरू आहे. फक्त सभा घेऊन उपयोग नाही, कामे व्हायला हवीत. अकार्यक्षम नगराध्यक्षांमुळे सभेवर बहिष्कार टाकला आहे. सत्ताधारी नगरसेवकदेखील त्यांच्यावर नाराज आहेत. राजकारण बाजूला ठेवून लोकनियुक्त नगरसेवकांना विश्वासात घेतले पाहिजे. सन्मानाची वागणूक दिली पाहिजे." 
दादासो पाटील, उपनगराध्यक्ष

Web Title: Why Shiv Sena, NCP Boycott Islampur Municipal meeting

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com