पुण्यात सॅनिटायझर, हॅंडग्लोजच्या किंमती वाढल्या

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 मार्च 2020

कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या देशात वाढल्याच्या बातम्यांनंतर अवघ्या आठ तासांमध्ये ‘एन ९५ मास्क’, सॅनिटायजर, हॅंडग्लोजच्या किमती दुपटीपेक्षा जास्त, तर खप दोनशे पटीने बुधवारी वाढला.

पुणे - कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या देशात वाढल्याच्या बातम्यांनंतर अवघ्या आठ तासांमध्ये ‘एन ९५ मास्क’, सॅनिटायजर, हॅंडग्लोजच्या किमती दुपटीपेक्षा जास्त, तर खप दोनशे पटीने बुधवारी वाढला. थर्मामीटरचाही तुटवडा निर्माण झाला. कोरोना विषाणूंच्या उद्रेकाचा गैरफायदा घेत या किमती वाढल्याने पुणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत, अशी मागणीही करण्यात आली. 

जगभरातील ७८ देशांमध्ये कोरोना विषाणूंचा उद्रेक झाला आहे, त्यामुळे उद्रेक झालेल्या देशांमधून विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ही काळजी घेऊनही देशात एकाच दिवशी १५ जणांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याच्या बातम्या मंगळवारी सकाळपासून सुरू झाल्या, त्यामुळे बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मास्क, हॅंडग्लोज, सॅनिटायजरच्या किमती दुपटीने वाढल्या. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या आठ तासांमध्ये एका घाऊक विक्रेत्याकडून २५ हजार ‘एन ९५’ प्रकारच्या मास्कची विक्री झाली. मंगळवारी अवघ्या हजार मास्कची विक्री झाली होती.

‘एन ९५’च्या एका मास्कची घाऊक बाजारातील विक्री किंमत मंगळवारी १०० रुपये होती, ती मंगळवारी संध्याकाळपर्यंत ३०० रुपयांहून अधिक झाली. एका सर्जिकल मास्कची घाऊक किंमत एक ते दीड रुपया होती, त्याची मागणीही मर्यादित होती; पण आता त्याचाही तुटवडा निर्माण झाला असून, घाऊक बाजारपेठेतील खरेदी किंमत १५ ते १८ रुपये झाली, त्यामुळे किरकोळ बाजारात एका सर्जिकल मास्कची किंमत २० रुपये असल्याचे दिसून आले. 

थर्मामीटरच्या किमतीचा ‘पारा’ वाढला
ताप मोजण्यासाठी पारा असलेले आणि डिजिटल अशा दोन्ही प्रकारच्या थर्मामीटरचीही मागणी वाढली. चीनमधून भारतात थर्मामीटर आयात होते. पण, दोन-अडीच महिन्यांपासून चीनमधील आयात थांबल्याने थर्मामीटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच, भारतातून श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया येथे थर्मामीटरची निर्यात केली, त्यामुळे पुण्यात अचानक थर्मामीटरची मागणी वाढल्याने काही अंशी त्याचा तुटवडा निर्माण झाल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

Web Title N94 Masks Sanitizers Handglows Cost More Than Double


संबंधित बातम्या

Saam TV Live