उन्हामुळे कामाच्या वेळात बदल, तासांमध्येही कपात

उन्हामुळे कामाच्या वेळात बदल, तासांमध्येही कपात

नागपूर - दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे पोटासाठी स्थलांतर सुरू आहे. ते थांबविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांची संख्या वाढविण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १५६१ कामे सुरू आहेत. वारेमाप कामे असली तरी त्यावर कार्यरत मजुरांची संख्या प्रतिदिवस केवळ ६ हजारांच्याच घरात आहे.

यावरून मजुरांचा रोजगार हमीच्या कामांना मिळणारा अल्प प्रतिसाद सहजच लक्षात येतो. उन्हाळा लक्षात घेऊन कामाच्या वेळेत बदल आणि तासातही कपात करण्यात आली. यानंतरही मजुरांचा प्रतिसाद मात्र वाढला नाही. 

ग्रामीण भागातील जनतेला जवळच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून अकुशल कामगारांना रोजगार पुरविण्यात येतो. सध्या रोहयोच्या कामगारांना २०६ रुपये मजुरी देण्यात येते. प्रत्येक कामगाराला किमान १०० दिवस काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कामाचे दिवस १५० पर्यंत वाढविण्यात आले आहे. मजुरांनी मागणी केल्यास सरकार संपूर्ण ३६५ दिवसही काम देण्यास तयार आहे. दुष्काळी भागातील नागरिकांना त्यामुळे लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. म्हणूनच रोहयोमध्ये मूलभूत सुविधांसह शेतातील कामांचाही समावेश करण्यात आला. सध्या रस्ते, जलसंधारण, गटारी, शेततळे, तलाव अशी एकूण १५६१ कामे जिल्ह्यात सुरू आहे. यावर दरदिवशी सरासरी ६ हजार १७६ म्हणजेच दर आठवड्याला ३७ हजार ५९ मजूरच उपलब्ध आहेत. 

प्रखर उन्हामुळे मे आणि जून महिन्यात ४० टक्के कामाच्या वेळेत कपात करण्यात आली आहे. यानंतरही मजुरांनी कामांकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. मिळणारी अल्प मजुरी हेच नागरिकांच्या उदासीनतेचे कारण असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Employment Guarantee Scheme Work Labour

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com