परीक्षेच्या "टेन्शन'मुळे घरात गळफास घेऊन आत्महत्या

परीक्षेच्या "टेन्शन'मुळे घरात गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर - दहावीत 94 टक्‍के गुण घेऊन इंजिनिअर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या "टेन्शन'मुळे घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना आज हुडकेश्‍वरमध्ये उघडकीस आली. अभिनव विलास गुंडमवार (वय 19) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास गुंडमवार हे नामांकित आर्किटेक्‍चर आहेत. पत्नी व दोन मुलांसह ते शक्‍तीनगरात राहत होते. त्यांचा एकुलता मुलगा अभिनव हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. त्याला दहावीत 94 टक्‍के गुण मिळाले होते. वडिलांप्रमाणे आपणही इंजिनिअर व्हावे, अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे तो अभ्यासाच्या तयारीला लागला होता. मात्र, परीक्षेचा दिवस येईपर्यंत अभ्यास पूर्ण न झाल्याची त्याला खंत होती. त्यामुळे तो गेल्या आठवड्यापासून तणावात होता. त्याच्या वागण्यातून आणि बोलण्यातून त्याच्या मनातील धुसफूस कुटुंबीयांच्या लक्षात येत होती. त्यामुळे वडिलाने त्याच्याशी अभ्यासाविषयी वारंवार चर्चाही केली. अभिनव रात्र आणि दिवसभर अभ्यास करीत होता. त्यामुळे जेवणाची वेळ वगळता तो पुस्तके घेऊनच बसत होता. आज सोमवारी अभियांत्रिकीसाठी असलेली प्रवेश पात्रता परीक्षा (जेईई) असल्याने अभिनवने रविवारी रात्रभर जागून अभ्यास केला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास वडील त्याला हाक देण्यासाठी त्याच्या खोलीकडे गेले. दरवाजावर थाप मारून त्याला हाक दिली; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजाच्या वरून उंचावून बघितले असता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी लगेच आरडाओरड केली आणि शेजाऱ्यांना आवाज दिला. शेजारी राहणाऱ्या मुलाने खिडकीतून आत शिरून दरवाजा उघडला. आतमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत अभिनवला पाहताच आईने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी लगेच हुडकेश्‍वर पोलिसांना फोन केला. एपीआय सखाराम मोले पथकासह पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन मेडिकलला रवाना केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

विचित्र स्वप्नं पडतात... 
"मला रात्रभर झोप येत नाही. मला विवित्र स्वप्नं पडतात. त्यामुळे मी "सायकॉलॉजीकली, मेंटली आणि फिजिकली' तणावात आहे. मला जगावेसे वाटत नाही. खूप टेन्शन आले आहे. कुणावर नाराजी नाही. आई, ताई, बाबा तुम्ही आपली काळजी घ्या.' असा उल्लेख असलेली सुसाइड नोट अभिनवने लिहिली. लिहिताना तो रडत असावा. त्याच्या अश्रूमुळे त्याने लिहिलेल्या सुसाइड नोटवर डाग पडलेले होते. 

Web Title: Student Suicide in nagpur

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com