राष्ट्रीय शेतकरी दिवस | 'मी शेतकरी बोलतोय' ऐका शेतकऱ्याची दयनीय व्यथा

साम टीव्ही
बुधवार, 23 डिसेंबर 2020

आज राष्ट्रीय शेतकरी दिन. कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत आंदोलनाचा वणवा पेटलाय. या सगळ्या गदारोळात शेतकरी दिनाच्या निमित्ताने एका शेतकऱ्याला काहीतरी बोलायचंय. पाहूयात काय म्हणतोय आपल्या सर्वांचा अन्नदाता...

नमस्कार... ओळखलंत का? कपड्यांवरून तरी ओळखा की राव. नाही ओळखलं का? ठीक आहे... मीच सांगतो... मी शेतकरी बोलतोय... मातीत राबणारा... घाम गाळणारा... निगुतीनं शेती करत सोनं पिकवणारा... बरं झालं... सोन्यावरून आठवलं... कारभारीन लय वर्सापासनं सोन्याचं डोरलं मागतीया... कानातलं डूल करायचंय म्हणत म्हणत नातू आता कॉलेजात जायला लागलाय... कानात डूल घालायचं वय निघून गेलं त्याचं पर, माझ्याच्यानं डूल काही बनलंच न्हाय...

पाहा व्हिडिओ -

आन कारभारणीच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोतच तेवढी राहिलीय... पण असो... आभाळ कधी पिकं करपवतंय तर कधी सारं शिवार बुडवून टाकतंय... तरीबी घाम गाळत मातीतनं सोनं पिकवतूय... बाजारात त्याला कोळशाची किंमत मिळंना... रस्त्यावर भाजी विकायला बसावं तर, शहरातली माणसं 20 रुपयाची पेंडी 10 रुपयाला मागत्यात... झालेला खर्च तरी निघंल, म्हणत भाजी इकून मोकळ्या हातानं घरी आलूय कितींदा... माझ्या आज्यानं त्येच केलं... बापानंबी त्येच केलं आन आता मी बी त्येच करतोय... पर आता पोरं मोठी झाली... त्यांचं शिक्षाण हाय... पोरीचं लगीन हाय... पडकं घर बांधायचंय... बैल घ्यायचाय... या रानात कष्ट उपसून हे सगळं होईना आता...  म्हणून रानात काट्याकुट्यातनं चालणारे पाय आता आंदोलनात उतरतायत... आंदोलनासाठी आम्ही शहरात आलो, उंचच उंच इमारतींच्या कोंढाळ्यातल्या चकचकीत रस्त्याने चालताना, शहरी माणसं आमच्याकडं कुत्सितपणे बघत राहतात... आमचे सुरकुतलेले चेहरे, मळकी-फाटकी कापडं बघून नाकं मुरडतात... पण आम्हाला त्याचं कायबी वाटत न्हाय बगा... का वाटावं... तुम्ही शत्रू थोडीच आहात आमचे... शेतकऱ्यांच्याच पोटी जन्म घेऊन, चार बुकं शिकून शहरात आलेली आमचीच पोरं तुम्ही... आम्हाला लेकरावानीच की... तुम्ही कितीबी राग-राग केला तरी आम्ही तुम्हाला उपाशी मरून न्हाय देणार... आन काय हो... तुमच्या त्या सॅण्डविच, बर्गर आन फिजा-बिजा म्हतत्यात त्यात आमीच पिकवेली भाजी आसतीया की लेकांनो... आसू द्या... सुखाने खा... आनंदात राहा... पर आमच्याबी पोटाच्या खड्ड्याकडं बघा जरा... हा लढा फक्त मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याचाच नाहीय बाबांनो... त्यांच्याच पोटी घेतलेल्या तुमचाबी हाय की... राग नका मानू... पर, मन येतं दाटून कधीकधी... आम्ही मायबाप सरकारकडं पदर पसरलाय... जमलं तर आमच्या थरथरत्या हातांना आधार द्या... लय बोललो... माफ करा... थांबतो आता... काळजी घ्या

 

 

 

कोल्हापूर

 


संबंधित बातम्या

Saam TV Live