उत्तर प्रदेशाच्या राज्यपालपदी आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती; राम नाईक यांना विश्रांती

उत्तर प्रदेशाच्या राज्यपालपदी आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती; राम नाईक यांना विश्रांती

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशाच्या राज्यपालपदी राम नाईक यांच्याऐवजी आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर लालजी टंडन यांना बिहारमधून मध्य प्रदेशात हलविण्यात आले आहे. गोवा व महाराष्ट्रासह अन्य पाच राज्यांच्या राज्यपालांचीही मुदत पुढच्या दोन महिन्यांत संपणार आहे. 
गोवा व कर्नाटक पाठोपाठ मध्य प्रदेश हे राज्य भाजप नेतृत्वाच्या "अजेंड्यावर' असल्याचे सांगण्यात येते. तेथे कॉंग्रेसच्या कमलनाथ सरकारला अत्यंत निसटते बहुमत आहे. त्यानंतर जेथे कॉंग्रेसला तुलनेने कमी बहुमत आहे व भाजपचे संख्याबळ लक्षणीय आहे असे राजस्थान हे राज्य आहे. 

सहा राज्यांतील राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील चौघांची राज्यपालपदाची मुदत संपली आहे. या बदल्यांबाबत राष्ट्रपतींच्या सहीने आज दुपारी आदेश काढण्यात आला. 85 वर्षांचे राम नाईक यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ उद्या (ता. 21) संपत आहे. त्यांना अद्याप पावेतो अन्य कोणतेही राज्य दिले गेलेले नसल्याने त्यांची वर्णी भाजपच्या मार्गदर्शक मंडळात लावली जाण्याची शक्‍यता वर्तविली जाते.

आज झालेल्या अन्य नियुक्‍त्यांमध्ये पश्‍चिम बंगालच्या राज्यपालपदी जगदीप धनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केसरीनाथ त्रिपाठी यांचा कार्यकाळ संपत आहे. रमेश बैस यांना त्रिपुराचे राज्यपाल बनविण्यात आले होते. त्रिपुरातील कल्याणसिंह सोळंकी यांचीही मुदत संपली होती. 2009 ते 2014 या काळात बैस हे भाजपचे लोकसभेतील प्रतोद होते. टंडन यांच्या जागी बिहारमध्ये फागू चौहान यांची तर पद्मनाभ आचार्य यांच्याऐवजी नागालॅंडच्या राज्यपालपदी आर.एन.रवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सारे राज्यपाल ज्या दिवशी आपापल्या राज्यांच्या राजभवनांत जाऊन कार्यभार स्वीकारतील त्या दिवसापासून त्यांचा कार्यकाळ किंवा नियुक्ती गृहीत धरली जाईल. 

दरम्यान, महाराष्ट्राचे विद्यासागर राव यांच्यासह अन्य पाच राज्यांच्या राज्यपालांचीही मुदत येत्या दोन महिन्यांत संपणार आहे. राव यांचा कार्यकाळ 29 ऑगस्टला संपत आहे.गोव्याच्या मृदुला सिन्हा यांचा कालावधी 30 ऑगस्टला संपणार आहे. त्याबरोबरच कर्नाटकचे वजूभाई वाला, राजस्थानचे कल्याण सिंह व केरळचे पी सथाशिवम यांचाही कार्यकाळ लवकरच संपत आहे. 

Web Title: Transfer of 6 governor and Ram Naik have to take rest

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com