नवी मुंबई महापालिकेचा मॉल्सना दणका

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - मोकळ्या जागेत बेकायदा स्टॉल्स उभारणाऱ्या नवी मुंबईतील मॉल्सवर महापालिकेने धडक कारवाई केली. मॉलमधील मोकळ्या जागेचा वाणिज्य वापर करून "मॉलमध्ये जीवाशी खेळ' या मथळ्याखाली "सकाळ'ने सोमवारी (ता. 31) बातमी दिली होती. त्यानंतर जाग्या झालेल्या प्रशासनाने वाशीतील रघुलीला, सेंटर वन आणि इनऑर्बिट मॉलवर विभाग कार्यालयाने कारवाई केली. सीवूड्‌समधील ग्रॅण्ड सेंट्रल मॉलला बेलापूर विभाग कार्यालयाने नोटीस बजावली आहे, अशी माहिती विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांनी दिली. 

वाशीतील रघुलीला मॉलमध्ये गेल्या आठवड्यात स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर मॉलमधील मोकळ्या जागांच्या गैरवापराबाबत "सकाळ'ने बातमी दिली होती. वाशी, कोपरखैरणे, नेरूळ येथील मॉलमध्ये मोकळ्या जागांचा वाणिज्य वापर सुरू असल्याचे यामुळे उघडकीस आले होते. अनेक ठिकाणी मोकळ्या जागा भाड्याने देऊन तेथे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मॉलमधील मोकळ्या जागा कमी होऊन आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मंगळवारी वाशी विभाग कार्यालयाने रघुलीला, सेंटर वन, इनऑर्बिट मॉल व्यवस्थापनाला बेकायदा स्टॉल्सप्रकरणी नोटीस बजावली. ज्या ठिकाणी बेकायदा स्टॉल्स आढळले आहेत. तसेच जे स्टॉल्स काढण्यात अडचण येत होती त्यांना सात दिवसांची मुदत दिली आहे, अशी माहिती विभाग अधिकारी महेंद्र ठोके यांनी दिली. रघुलीला, सेंटर वन व इनऑर्बिट मॉलकडून विभाग कार्यालयाने दंड वसूल केला आहे. वाशीप्रमाणेच बेलापूर विभाग कार्यालयानेही सीवूड्‌समधील मॉलला नोटीस बजावली आहे. या मॉलमध्ये मोकळ्या जागेत स्टॉल्सला परवानगी नसल्याचे विभाग कार्यालयातून सांगण्यात आले. त्यानुसार त्यांना स्टॉल्स हटवण्यासाठी नोटीस दिली आहे, असे तांडेल यांनी सांगितले. 

हप्तेखोरांचे धाबे दणाणले 
"मॉलमध्ये जीवाशी खेळ' ही बातमी प्रकाशित होताच वाशीतील काही मॉल्समधून हप्तेबाजी करणाऱ्या राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले. काही नेत्यांनी मोकळ्या जागांवर त्यांच्या मर्जीतील व्यक्तींना स्टॉल्स दिले असून, ते त्यांच्याकडून लाखोंचे भाडे वसूल करीत आहेत. काही जण हाऊस कीपिंगच्या नावाखाली हप्ते उकळत आहेत. अशा हप्तेखोरांना मॉलच्या व्यवस्थापनांनी बैठक घेऊन खडसावले.

संबंधित बातम्या

Saam TV Live