अहमदनगरमध्ये 5 जागांवर महाविकास आघाडीचं वर्चस्व तर 4 ठिकाणी भाजप विजयी

अहमदनगरमध्ये 5 जागांवर महाविकास आघाडीचं वर्चस्व तर 4 ठिकाणी भाजप विजयी

नगर :  जिल्ह्यातील 13 पैकी नऊ पंचायत समित्यांवर महाविकास आघाडीचे, तर चार समित्यांवर भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले. त्यातील पाच पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्तापित केले आहे. मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी, आमदार आशुतोष काळे यांच्या कोपरगाव, तर रोहित पवार यांच्या कर्जत तालुक्यातील पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. 

शेवगाव पंचायत समितीवर पुर्वीप्रमाणेच माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले. श्रीगोंदे पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाने बाजी मारली. काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखालील संगमनेर पंचायत समितीत वर्चस्व सिद्ध झाले. काँग्रेसचा इतर कुठेही सभापती होऊ शकला नाही. नेवासे पंचायत समितीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाने बाजी मारत मंत्री शंकरराव गडाख यांचे नेतृत्त्व कायम असल्याचे दाखवून दिले. अकोले व पाथर्डी पंचायत समितीत मात्र भाजपने गड राखण्यात यश मिळविले. राहाता, श्रीरामपूर येथेही विखे गटाचेच वर्चस्व राहिले.

जामखेड पंचायत समितीत इच्छुक अससलेल्या दोघांपैकी एकानेही अखेरपर्यंत अर्ज दाखल केला नसल्याने पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रीया होऊ शकली नाही. भाजपला एकहाती सत्ता स्थापन करण्याची संधी असतानाही माजी मंत्री प्रा. राम शिंदे काहीच करू शकले नाहीत. या पंचायत समितीत चार सदस्य असून, सर्व भाजपचेच आहेत. त्यापैकी तीन शिंदे गटाचे आहेत. तर उपसभापती राजश्री मोरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी आमदार रोहित पवार यांना सहकार्य केले. पंचायत समितीत तीन विरुद्ध एक असे संख्याबळ निर्माण झाले आहे. दरम्यान, ही निवड प्रक्रीया बुधवारी (ता. 8) होणार आहे.

पंचायत समिती व सभापती, उपसभापती असे    

1) अकोले : दत्ता बोराडे (भाजप), दत्ता देशमुख (भाजप)
2) संगमनेर : आशा जोर्वेकर (काँग्रेस), नवनाथ आरगडे (काँग्रेस)
3) कोपरगाव : पोर्णिमा जगधने (राष्ट्रवादी), अर्जुन काळे (राष्ट्रवादी)
4) राहाता : नंदा तांबे (विखे गट), उमेश जपे (विखे गट)
5) श्रीरामपूर : संगिता शिंदे (विखे गट), बाळासाहेब तोरणे (विखे गट)
6) नेवासे : रावसाहेब कांगुणे (क्रांतिकारी), किशोर झोजार (क्रांतिकारी)
7) शेवगाव : क्षितीज घुले (राष्ट्रवादी), नुतन भोंगळे (राष्ट्रवादी)
8) पाथर्डी : सुनिता दौंड (भाजप), मनिषा वायकर (भाजप)
9) राहुरी : बेबीताई सोडनर (राष्ट्रवादी), प्रदीप पाटील (राष्ट्रवादी)
10) नगर : कांताबाई कोकाटे (शिवसेना), रवींद्र भापकर (काँग्रेस)
11) पारनेर : गणेश शेळके (शिवसेना), सुनंदा धुरपते (राष्ट्रवादी)
12) श्रीगोंदे : गितांजली पाडळे (राष्ट्रवादी), रजनी देशमुख (राष्ट्रवादी)
13) कर्जत : अश्विनी कानगुडे (राष्ट्रवादी), हेमंत मोरे (राष्ट्रवादी)
14) जामखेड : निवड रद्द

Web Title -  ncp bags five panchayats ahmednagar district

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com