... तर मराठवाड्यात आघाडीच्या आणखी १० जागा वाढल्या असत्या! 

... तर मराठवाड्यात आघाडीच्या आणखी १० जागा वाढल्या असत्या! 

मराठवाड्यात अनेक ठिकाणी 'वंचित'ने आघाडीला विजयापासून 'वंचित' ठेवले.

महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही बऱ्याचअंशी निर्णायक ठरली होती. धर्मनिरपेक्ष, पारंपरिक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांचं विभाजन करण्यात वंचित बहुजन आघाडीला एमआयएमसोबत घेऊन मोठे यश मिळाले होते. या 'वंचित'च्या दणक्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काही दिग्गजांना पराभव पत्कारावा लागला होता. लोकसभेत वंचित बहुजन आघाडीला कुठेही विजय मिळाला नसला (औरंगाबाद वगळता) तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयापासून 'वंचित' ठेवण्यात त्यांना यश मिळाले होते. याचा फायदा हा भाजप-शिवसेना युतीला जबरदस्त झाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या या पराभवाला 'वंचित' कारणीभूत ठरली असल्याचा आरोप केला गेला. आता तोच अनुमान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निघाला आहे. 

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा प्रभाव दिसेल असे सांगितले जात होते. त्यामुळेच ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसलाच ४० जागा देण्याची घोषणा केली होती. 'वंचित'च्या या प्रभावाच्या आत्मविश्वासाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही आत्मविश्वास गमावला होता. निवडणुकीत मात्र, (ठरल्याप्रमाणे?) एमआयएम आणि वंचित एकत्र लढले नाहीत. तरीही दोघांचा फटका आणि निकालानंतर झटका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला बसलाच. जर वंचित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत असते, तर सत्ता ही आघाडीला मिळाली असती, हे महाराष्ट्रात समोर आलेल्या मतदानावरून लक्षात येते. यामध्ये कोणी स्वीकारा किंवा न स्वीकारा वंचितला केवळ आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आलंय, हे मात्र नक्की! 

महाराष्ट्रातील प्रत्येक विभागावर पडलेल्या मतांची आकडेमोड केली तर वंचितने आघाडीला सत्तेपासून वंचित केले, हेच निष्कर्ष निघतील. मराठवाड्यात तर किमान १० जागांवर वंचितने आघाडीला विजयापासून वंचित ठेवले. त्यात उस्मानाबाद, तुळजापूर, गेवराई, पैठण, फुलंब्री, जिंतूर हिंगोली, कळमनुरी, नांदेड दक्षिण यासह आणखी काही मतदारसंघाचा समावेश आहे. वंचितने जरी मुख्यमंत्री पदाचा दावा केला असला तरीही एकाही ठिकाणी (मराठवाड्यात तरी) वंचितचा उमेदवार विजयाच्या शर्यतीत नव्हताच. 

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे कैलास पाटील हे ८७ हजार ४८८ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय निंबाळकरांचा पराभव केला. संजय निंबाळकरांना ७४ हजार २१ मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीच्या धनंजय शिंगाडे यांनी १५ हजार ७५५ मते घेतली. जर याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसता, किंवा वंचित बहुजन आघाडी ही आघाडीसोबत राहिली असती तर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय सहज होता.

तुळजापूरमध्ये काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील यांनी ९९ हजार ३४ मते घेऊन विजयी झाले. काँग्रेस मधुकर चव्हाण यांचा पराभव झाला. त्यांना ७५ हजार ८६५ मते मिळाली. याही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही मधुकर चव्हाण यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. वंचित बहुजन आघाडीचे अशोक जगदाळे यांना ३५ हजार ३८३ मते मिळाली. ही मतं काँग्रेसची मानली जात होती. 

बीड जिल्ह्यातील गेवराई मतदार संघात भाजपाचे लक्ष्मण पवार हे ९९ हजार ६२५ मते घेऊन दुसऱ्यांचा विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित यांचा पराभव केला. त्यांना ९२ हजार ८३३ मतदान पडले. इथे वंचित बहुजन आघाडीचे विष्णु देवकाते यांना साडेआठ हजार मते मिळाली. त्याशिवाय अपक्ष म्हणून असलेले शिवसेनेचे बदामराव पंडित यांना ५० हजार ८९४ मते मिळाली. जर या मतांचं विभाजन झालं नसतं तर राष्ट्रवादी काँग्रेसला विजय निश्चित होता, असं मानलं जात आहे. 

नांदेड दक्षिणमध्ये अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय डी. पी. सावंत यांना वंचित आणि एमआयएमने मोठा झटका दिला. तसा हा काँग्रेसचा बालेकिल्लाच होता. मात्र, यात शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांनी ६२ हजार ८८४ मते घेऊन विजयी झाले. डी. पी. सावंत यांना ५० हजार ७७८ मते मिळाली. एमआयएमचे फिरोज लाला यांना ४१ हजार ८९२ मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे मुकुंदराव चावरे यांना २६ हजार ५६९ मते मिळाली. याही ठिकाणी डी. पी.सावंत यांना विजयापासून वंचित ठेवण्यात यश आलं. आणि एमआयएम आणि वंचितही विजयापासून वंचित राहिले.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संदिपान भुमरे हे ८३ हजार ४०३ मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय गोरडे यांना ६९ हजार २६४ मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे विजय चव्हाण यांना २० हजार ६५४ आणि एमआयएमचे प्रल्हाद राठोड यांना १७ हजार २१२ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या दोघांची एकत्रित बेरीज ही जवळपास ३६ हजार ८५६ इतकी होते. ते एकत्रित असते तरी वंचितला विजय मिळाला नसता, मात्र त्या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला विजयापासून दूर ठेवले. 

फुलंब्री विधानसभा मतदारसंघ विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे एक लाख सहा हजार १९० मते घेऊन निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांना ९० हजार ९१६ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जगन्नाथ रिठे यांना १५ हजार २५२ मते मिळाली. याही ठिकाणी वंचितने काँग्रेसचा विजय रोखला असे काँग्रेसकडून सांगितले जात आहे. 

जिंतूर मतदारसंघांमध्ये भाजपच्या मेघना बोर्डीकर या एक लाख १६ हजार ९१३ मते घेऊन विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय भांबळे यांचा पराभव केला. त्यांना एक लाख १३ हजार १९६ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे मनोहर वाकळे यांना १३ हजार १७२ मते मिळाली. तिथे वंचितने मतांची फूट पाडली नसती तर विजय राष्ट्रवादीचाच होता. 

हिंगोली विधानसभा मतदारसंघात तानाजी मुटकुळे हे ९५ हजार ३१८ मते घेऊन दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांनी पुन्हा भाऊराव पाटलांचा पराभव केला. भाऊराव पाटील यांना ७१ हजार २५३ मते मिळाली. इथेही वंचितची भूमिका निर्णायक ठरली. वंचितचे वसीम देशमुख यांना १९ हजार ८५६ मते मिळाल्यानं भाऊराव पाटलांचा विजय दूर राहिला. 

कळमनुरी हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार संघ असतानाही ८२ हजार ५१५ मध्ये येऊन भाजपचे संतोष बांगर हे विजयी झाले. मराठवाड्यात हा पहिलाच मतदारसंघ आहे, जिथे वंचितचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. वंचितचे अजित मगर यांना ६६ हजार १३७ मते मिळाली तर काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे यांना ५७ हजार ५४० मते मिळाली. जर धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेसमतांचे विभाजन झाले नसते तर विक्रमी मतावर डॉ. टारफे निवडून आले असते, असा दावा काँग्रेस नेत्यांचा आहे. 

मराठवाड्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र आले असते तर औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद मध्य, नांदेड दक्षिण या तीन मतदारसंघात त्यांना हमखास यश मिळालं असते. बरे काँग्रेस- राष्ट्रवादीच्या यशापयशाचा फारसा विचार न करता त्यांनी एकत्र लढले तरी त्यांना फारशी मजल मारली नसती, हे मतदारांनी वंचित आणि एमआयएमला केलेल्या मतांवरून लक्षात येतं. त्यामुळे वंचितची भूमिका ही आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याची होती, हे मतदारांनी मतमोजणीनंतर जाणले आहे, हे नक्की.

Web Title : NCP-Congress Seats Decreaase Because VBA In MarathWada

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com