'जय भवानी जय शिवाजी' म्हणत खासदारांनी शपथ घेताना केले मराठी बाण्याचे प्रदर्शन 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 जून 2019

नवी दिल्ली : 'जय भवानी जय शिवाजी', "छत्रपती शिवाजी महाराज की जय...' अशा जयघोषात महाराष्ट्रातील खासदारांनी सोमवारी लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेताना मराठी बाण्याचे प्रदर्शन केले. उदयनराजे भोसले आणि डॉ. सुजय विखे पाटील या खासदारद्वयींनी इंग्रजीतून; तर हीना गावीत, सुप्रिया सुळे, पूनम महाजन, सुधाकर शृंगारे आणि गोपाळ शेट्टी यांची हिंदीतील शपथेचा अपवाद वगळता महाराष्ट्रातील कॉंग्रेससह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व खासदारांनी माय मराठीतून शपथ घेतली. "एमआयएम'चे इम्तियाज जलील, अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनीही मराठीतून शपथ घेत मराठी बाणा दाखवला.

नवी दिल्ली : 'जय भवानी जय शिवाजी', "छत्रपती शिवाजी महाराज की जय...' अशा जयघोषात महाराष्ट्रातील खासदारांनी सोमवारी लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेताना मराठी बाण्याचे प्रदर्शन केले. उदयनराजे भोसले आणि डॉ. सुजय विखे पाटील या खासदारद्वयींनी इंग्रजीतून; तर हीना गावीत, सुप्रिया सुळे, पूनम महाजन, सुधाकर शृंगारे आणि गोपाळ शेट्टी यांची हिंदीतील शपथेचा अपवाद वगळता महाराष्ट्रातील कॉंग्रेससह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व खासदारांनी माय मराठीतून शपथ घेतली. "एमआयएम'चे इम्तियाज जलील, अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनीही मराठीतून शपथ घेत मराठी बाणा दाखवला. केवळ गिरीश बापट, सुनील मेंडे, उन्मेष पाटील या खासदारांनी संस्कृतमध्ये शपथ घेऊन वेगळेपण राखले. 

नितीन गडकरी, अरविंद सावंत, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री या नात्याने सकाळीच शपथ घेतली होती; तर इंग्रजी आद्याक्षरांनुसार महाराष्ट्राचा क्रम तेरावा असल्यामुळे मराठी खासदारांचा शपथविधी दुपारी उशिरा झाला. नंदुरबारच्या खासदार हीना गावित यांनी सर्वप्रथम; तर हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी सर्वांत शेवटी शपथ घेतली. गांधी टोपी परिधान केलेले शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी मराठीतून शपथ घेताना "छत्रपती शिवाजी महाराज की जय' म्हणून समारोप केला; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी "जय शिवराय, जय महाराष्ट्र' म्हणून शपथ पूर्ण केली. "राष्ट्रवादी'चे खासदार सुनील तटकरे, भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनीही "जय हिंद जय महाराष्ट्र' घोषणा दिल्या. मात्र, ते शपथ घेण्यासाठी आले असताना भाजपच्या काही खासदारांनी मिस्किलपणे "जय ऊर्मिला' अशी घोषणा देऊन निवडणुकीची आठवण करून दिली. कॉंग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांचा पराभव करून शेट्टी पुन्हा लोकसभेवर निवडून आले आहेत. 

यादरम्यान शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे हे सातत्याने "छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा देत होते; तर कॉंग्रेसचे एकमेव खासदार सुरेश धानोरकर यांच्या शपथविधीच्या वेळी "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी बाक वाजवून अभिनंदन करत होत्या. मात्र शपथ पूर्ण होताच धानोरकर यांनी विरोधी बाकावर जाण्याच्या आधी प्रथम शिवसेनेच्या खासदारांकडे जाऊन त्यांचे अभिनंदन स्वीकारले. 

भगव्या पेनाच्या शाईने सही 
शपथ घेतल्यानंतर संसदेच्या पुस्तिकेत सही करावी लागते. सर्व खासदारांनी सचिवालयाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या पेनाने सह्या केल्या; परंतु हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी स्वतःचा भगव्या शाईचा पेन वापरून केलेली सही मात्र चर्चेचा विषय ठरली.

Web Title: amol kolhe, jaleel and navneet kaur rana taking oath in marathi


संबंधित बातम्या

Saam TV Live