पाचव्या टप्प्यातील 51 जागांसाठी 62.2 टक्के मतदान 

पाचव्या टप्प्यातील 51 जागांसाठी 62.2 टक्के मतदान 

 नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज सात राज्यांमधील 51 जागांसाठी सरासरी 62.2 टक्के मतदान झाले. याही वेळेस पश्‍चिम बंगालने वाढीव मतदानात आघाडी राखली आहे. या राज्यात 74 टक्के मतदान झाले, तर जम्मू-काश्‍मीरमध्ये अनंतनाग मतदारसंघात पुन्हा एकदा अत्यल्प म्हणजे 8.76 टक्के मतदानाची नोंद झाली. याही टप्प्यात पश्‍चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हाणामारीचे प्रकार घडले. भाजप आणि तृणमूलने एकमेकांवर आरोप करत याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारीही दाखल केल्या. 

सोनिया गांधी, राहुल गांधी, राजनाथसिंह, स्मृती इराणी यांच्यासह अनेक बड्या चेहऱ्यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांत आज बंदिस्त झाले. आज मतदान झालेल्या 51 मतदारसंघांपैकी भाजपला 2014 मध्ये 39 जागांवर विजय मिळाला होता, तर कॉंग्रेसला केवळ दोन जागा जिंकता आल्या होत्या. राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी अशी बहुचर्चित लढत असलेल्या अमेठीमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. पश्‍चिम बंगालमध्ये मतदानाचे प्रमाण वाढले असले तरी बराकपूरमध्ये भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे मतदानाला गालबोट लागले. दुसरीकडे अनंतनाग मतदारसंघात येणाऱ्या पुलवामातल्या रोहमू मतदान केंद्रावर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून मतदान बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही, तर शोपियॉंमध्येही मतदान केंद्रावर पेट्रोल बॉम्बचा हल्ला झाला. 

जम्मू- काश्‍मीरच्या लडाख मतदारसंघामध्ये 63.76 टक्के मतदान झाले असले तरी तीन टप्प्यांत निवडणूक होत असलेल्या संवेदनशील अनंतनाग मतदारसंघामध्ये 8.76 टक्केच मतदान नोंदविण्यात आले. 

राज्यनिहाय मतदान (पाचवा टप्पा, आकडे टक्‍क्‍यांत) 
झारखंड - 63.72 
पश्‍चिम बंगाल 73.97 
मध्य प्रदेश 62.60 
उत्तर प्रदेश 57.33 
बिहार 57.86 
राजस्थान 63.75

Web Title: fifth phase loksabha election 2019 votiing

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com