5 व्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

5 व्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (सोमवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली आहे. काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री राजनाथसिंह, अमेठीत स्मृती इराणी यांच्या आव्हानाचा मुकाबला करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राजस्थानातून अर्जुन राम मेघवाल व राज्यवर्धनसिंह राठोड आदी दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला यंत्रबंद होणार आहे.

या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, राजस्थानातील १२, मध्य प्रदेश व पश्‍चिम बंगाल प्रत्येकी सात, बिहार पाच, झारखंड चार, जम्मू आणि काश्‍मीर व लडाखमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या ५१ जागांवरील मतदान पूर्ण झाल्यावर लोकसभेच्या ५४३ जागांपैकी सव्वाचारशे जागांवरील राजकीय गजबज थंडावेल. सहाव्या व सातव्या टप्प्यात प्रत्येकी ५९ जागांसाठी १२ मे आणि १९ मे रोजी मतदान होईल. पाचव्या टप्प्यात चार कोटी २३ लाख ६३ हजार पुरुष, चार कोटी १२ लाख ८३ हजार १६६ महिला व २,२१४ तृतीयपंथी मतदार आहेत.  

उत्तर भारतात रणरणत्या उन्हात झालेल्या प्रचारयुद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा व काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यासह साऱ्याच प्रमुख नेत्यांनी जोरदार प्रचार केला. यंदा २०१४ सारखी लाट नसणे, उत्तर प्रदेशात सप-बसप महाआघाडी व प्रियांका यांची प्रचारात उडी, या गोष्टींमुळे प्रचारात रंगत आली. रायबरेलीत भाजपचे दिनेश प्रताप सिंह चमत्कार करणार का, भाजपचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या राजधानीत लखनौमध्ये गृहमंत्री राजनाथसिंह त्यांची जागा राखणार का, बिहारच्या मधुबनीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते हुकूमदेव नारायण यादव यांचे पुत्र सुरेश जिंकणार का, मूळचे राज्यसभेचे म्हणविले जाणारे राजीव प्रताप रूडी पुन्हा लोकसभेवर येणार का, अशा विविध प्रश्‍नांचीही उत्तरे याच टप्प्यात मिळणार आहेत. 

उत्तर प्रदेशात केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती फतेहपूरमधून नशीब आजमावत आहेत. बिहारच्या सारनमध्ये राजीव प्रताप रूडी विरुद्ध लालूप्रसाद यादव यांचे व्याही आणि तेजप्रताप यादव यांचे श्‍वशूर चंद्रिका राय यांची लढत लक्षवेधी असेल. यशवंत सिन्हा यांचे पुत्र व मोदी सरकारमधील विमानवाहतूक राज्यमंत्री जयंत हे झारखंडच्या हजारीबागमध्ये लढत आहेत. राजस्थानात केंद्रीय मंत्री व ऑलिम्पिक पदकविजेते कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड विरुद्ध काँग्रेसच्या उमेदवार कृष्णा पुनिया यांची लढत क्रीडा जगतासाठी चर्चेचा विषय आहे. कृष्णा पुनिया यांनीदेखील ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. पश्‍चिम बंगालमध्ये बराकपूरमधून तृणमूल काँग्रेसचे माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांना त्यांच्याच निकटवर्तीने भाजपतर्फे दिलेल्या आव्हानामुळे येथील लढतही चर्चेचा विषय ठरली आहे. 

पाचवा टप्पा 
राज्ये : 7 
मतदारसंघ : 51 
उमेदवार : 674 
मतदार : 8.76 कोटी 
मतदान केंद्रे : 96,088 

जम्मू आणि काश्‍मीर : 2 
राजस्थान : 12 
मध्य प्रदेश : 7 
उत्तर प्रदेश : 14 
बिहार : 5 
पश्‍चिम बंगाल : 7 
झारखंड : 4 

Web Title: fifth phase loksabha election 2019 votiing starts

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com