मुंबईकरांसाठी 1 जुलैपासून नवीन निर्बंध

साम टीव्ही
सोमवार, 29 जून 2020
  • अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईत पोलिसांची 'लक्ष्मणरेषा'
  • दोन किलोमीटरच्या परिघाबाहेर प्रवास करण्यास मज्जाव 
  • अनावश्यक गर्दीला आळा घालण्यासाठी पोलिसी खाक्या 

मुंबईत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. मुंबई पोलिसांनी तब्बल 4 हजार 864 गाड्या जप्त केल्यात. शिवाय, मुंबईकरांसाठी पोलिसांनी नवी लक्ष्मणरेषा आखून दिलीय. 

लॉकडाऊनचा तब्बल तीन महिन्यांचा काळ संपता संपता राज्य सरकारनं मिशन बिगीन अगेनचा नारा दिला. त्या अंतर्गत राज्य सरकारनं काही दुकानं, कार्यालयं सुरू करायला अटीशर्थींसह परवानगीही दिली. मात्र, त्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवत लोकांनी गर्दी करायला सुरूवात केली. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी या अनावश्यक गर्दीला आवर घालण्यासठी नवी लक्ष्मणरेषा आखून दिलीय. त्यानुसार प्रत्येकाला दोन किलोमीटरच्या परिघातच संचार करायला परवानगी देण्यात आलीय. 

कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्यानं सर्वांनी सुरक्षेसाठी वैयक्तिक काळजी घेण्याचं आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं, असं आवाहनदेखील पोलिसांनी केलंय. त्यासाठी मार्गदर्शक सूचनाही पोलिसांनी जारी केल्यात. 

केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच घराबाहेर पडावं. तसंच, घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. घरापासून फक्त 2 किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकानं इत्यादी ठिकाणी जाता येईल, तशी मुभा पोलिसांनी दिलीय. व्यायामाची परवानगी घरापासून 2 किमीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. तर कार्यालय किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतच 2 किमीच्या बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलीय. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक असेल. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय. सोशल डिस्टन्सिंगचे निकष न पाळणारी दुकानं बंद करण्यात येतील, असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. तसंच, रात्री 9 ते पहाटे 5 या वेळेत असलेल्या कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाणारंय. तर, वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळून येणारी सर्व वाहनं जप्त केली जातील, असंही पोलिसांनी म्हटलंय. 

एकूणच, सर्व नागरिकांनी जबाबदारीनं वागून अनावश्यक फिरणं टाळावं, असं आवाहन पोलिसांनी केलंय. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live