शेतकऱ्यांनो, सावधान!  येत्या काळात पावसाचे दोन खंड 

साम टीव्ही
शुक्रवार, 19 जून 2020
  • शेतकऱ्यांनो, सावधान ! 
  • जूनअखेर आणि जुलैमध्ये पावसाचे दोन खंड 
  • खरीप हंगामाची घ्यावी लागणार काळजी 

नाशिक : जूनच्या शेवटी आणि जुलैमध्ये पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम स्वाभाविकच खरिप हंगामावर होईल हे नक्की 

राज्यभरात मॉन्सूनचं दणक्यात आगमन झालं. जूनच्या मध्यावरच चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला गती दिली. मात्र, असं असलं तरी हवामान खात्यानं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा दिलाय. जूनच्या अखेरीस आणि जुलैमध्ये पावसाचे दोन खंड असतील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

या अंदाजानुसार २३ जूनपर्यंत पाऊस उघडीप देईल, असं हवामान खात्यानं म्हटलंय.  
तर २४ जूनपासून १५ जुलैपर्यंत पाऊस होईल.  त्यानंतर पुन्हा १५ जुलैपासून २६ जुलैपर्यंत पावसात खंड पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.  तर २६ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत पाऊस पुन्हा जोर धरेल, असंही हवामान खात्यानं म्हटलंय.  मात्र, असं असलं तरी जुलै अखेरनंतर पुढील चित्र अधिक स्पष्ट व्हायला मदत होईल, असं हवामान अभ्यासक सांगतात. पावसाचा हा पॅटर्न लक्षात घेता, शेतकऱ्यांना पेरणी करताना काळजी घ्यावी लागणारंय. 

पावसाचा हा संभाव्य खंड पाहता, शेतकऱ्यांना कृषी विभागानं काही सूचनाही केल्या आहेत. 

 पावसाच्या खंडावेळच्या उपाययोजना
- कापसासाठी ठिबक आणि इतर पिकांना तुषार संचानं पाणी द्यावं. 
- शेती आणि बांध तणविरहीत ठेवावा.
- लष्करी अळीसारख्या किडीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क फवारावा

तर सुरुवातीच्या पावसामुळे सध्या जमिनीत ओलावा आहे. ढगाळ हवामान आणि आर्द्रता आहे. त्यामुळे पावसानं उघडीप दिली, तरीही त्याचा पिकांवर फारसा परिणाम होणार नाही, असं कृषी अभ्यासकांना वाटतं. पण, असं असलं तरी पावसाचा लहरीपणा लक्षात घेता शेतकऱ्यांनी वेळीच दक्षता बाळगणं गरजेचं आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live