भाजपच्या 'या' खासदाराविरुद्ध दाखल झाला अविश्वासाचा ठराव

सरकारनामा
बुधवार, 4 मार्च 2020

भंडारा  : भंडारा-गोंदियाचे खासदार व येथील नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्याविरोधात १८ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांच्याकडे अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अकरा, कॉंग्रेसच्या तीन, भाजपच्या दोन व दोन अपक्ष नगरसेवकांची स्वाक्षरी आहे. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात अवैधरित्या व नियमबाह्य बांधकाम तसेच शासकीय योजनांत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.

भंडारा  : भंडारा-गोंदियाचे खासदार व येथील नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्याविरोधात १८ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांच्याकडे अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अकरा, कॉंग्रेसच्या तीन, भाजपच्या दोन व दोन अपक्ष नगरसेवकांची स्वाक्षरी आहे. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात अवैधरित्या व नियमबाह्य बांधकाम तसेच शासकीय योजनांत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.

''नगराध्यक्ष मेंढे यांनी नगराध्यक्षपदाच्या कार्यशाळेत १३ एप्रिल २०१७ मध्ये भंडारा येथील शीट क्रमांक ४४ प्लॉट क्रमांक १४-१ मध्ये नगर परिषदेकडून अवैधरित्या परवानगी घेऊन बांधकाम केले. बहिणीचा मुलगा आदित्य पंधरे यांच्या नावावर करोडो रुपयांचे बांधकाम करून देयके काढलीआहे. सर्वसाधारण व स्थायी समितीचे कार्यवृत्त ठरवून दिलेल्या कालावधीत पूर्ण केले नाही. शासनाकडून मंजूर डी. पी. प्लॉनमधील राखीव, आरक्षित जागेचा वापर बदलण्याची कारवाई न करता बांधकाम केले. डंपिंग यार्डमध्ये असलेले बांधकाम नगराध्यक्षांनी वैयक्तिक स्वार्थासाठी केले आहे. गांधी चौकात झेंडा उभारताना नगराध्यक्षांनी भ्रष्टाचार केला आहे,'' असे आरोप ठेवून अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. 

सदर प्रस्ताव दाखल करतांना जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवकांची शहानिशा केली. यानंतर प्रस्ताव दाखल करून घेतला. या प्रस्तावावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक विनयमोहन पशिने, जुमाला बोरकर, कविता भोंगाडे, लता बागडे, उमेश ठाकरे, शुभांगी खोब्रागडे, विक्रम उजवणे, अश्‍विनी बुरडे, अख्तरी सलाम हाजी, सुनील साखरकर, स्मिता सुखदेवे, कॉंग्रेसचे शमीम शेख, अब्दूल जाबीर अब्दूल हकीम मालाधारी, जयश्री बोरकर, भाजपचे नितीन धकाते, साधना त्रिवेदी, अपक्ष मकसूद खान, कल्पना व्यास यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रस्तावावर चौकशी झाल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.

गेल्या महिन्याभरात भाजपचे नगरसेवक नितीन धकाते यांनी उपाध्यक्ष आणि सभापती निवडणुकीच्या वेळेस उघडपणे बंड केले होते. भाजपच्या नगराध्यक्षांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा त्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला जाईल, अशी पत्रकार परिषदेमध्ये उघडपणे धमकी दिली होती. मात्र, नगराध्यक्ष मेंढे यांनी याकडे कानाडोळा केला आणि ते त्यांना धोकादायक ठरले. महिन्याभरापूर्वी पवनी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पुनम काटेखाये यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानंतर भंडारा आणि साकोली या दोन नगरपालिकेच्या अध्यक्षांवर ही अविश्वास प्रस्ताव दाखल होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती

भाजपच्या बंडखोरांवर कारवाईची शक्‍यता

नगर परिषदेतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपच्या दोन नगरसेवक व भाजप पुरस्कृत एका अपक्ष नगरसेवकास आपल्या खेम्यात आणून अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. सध्या अविश्‍वास प्रस्तावाच्या बाजूने १८ नगरसेवक आहेत. प्रस्तावाचे समर्थन करणाऱ्या भाजपच्या दोन नगरसेवकांवर पक्षाकडून काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहे. आपल्या कार्यकाळात कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही. चौकशीअंती स्पष्ट होईल- सुनील मेंढे, खासदार व नगराध्यक्ष, भंडारा

Web Title no confidence motion against bhandara gondia mp sunil mendhe


संबंधित बातम्या

Saam TV Live