गृहपाठातून होणार सुटका; केंद्र सरकार लवकरच आणणार विधेयक 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 जून 2018

कोलकता - पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास देण्यास शाळांना मनाई करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच विधेयक आणणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली. शिकताना आनंद मिळाल्याशिवाय शिक्षण मिळत नाही, असेही जावडेकर म्हणाले.

कोलकता - पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास देण्यास शाळांना मनाई करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच विधेयक आणणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली. शिकताना आनंद मिळाल्याशिवाय शिक्षण मिळत नाही, असेही जावडेकर म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करावे आणि पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास देऊ नये, याबाबत राज्य सरकारांना सूचना देण्याचा अंतरिम आदेश मद्रास उच्च न्यायालयाने ३० मे रोजी केंद्र सरकारला दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

‘न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. निकालपत्राचा आम्ही अभ्यास करत असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्‍यक ते सर्व आम्ही करू,’ असे जावडेकर म्हणाले. बालशिक्षण हक्क कायद्याला अनुसरून घरचा अभ्यास बंद करण्यासाठीचे विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेत सादर करण्याचा सरकारचा निश्‍चय असल्याचे सांगत जावडेकर यांनी हे विधेयक मंजूर होईल, अशी आशा व्यक्त केली.

दप्तराच्या वजनाचे प्रमाण
लहान मुले ही वेटलिफ्टर नाहीत आणि दप्तरे म्हणजे भरलेली पोतीही नाहीत, असे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. किरुबाकरन यांनी सुनावले होते. तसेच, दप्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्‍क्‍यांहून अधिक नको, असेही त्यांनी सांगितले होते. पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित याव्यतिरिक्त दुसरा विषय अभ्यासक्रमात दिला जाऊ नये, यासाठी राज्य सरकारांना सूचना करण्याचे आदेशही त्यांनी केंद्र सरकारला दिले होते.

हसत खेळत शिक्षणावर माझा विश्‍वास आहे. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे दडपण आणणे योग्य नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी शक्‍य ते सर्व उपाय करू.
- प्रकाश जावडेकर, मनुष्यबळ विकासमंत्री

 


संबंधित बातम्या

Saam TV Live