मागेल त्याला शेततळे देणार, मात्र कसे?

मागेल त्याला शेततळे देणार, मात्र कसे?

कळंब (उस्मानाबाद) : मागेल त्याला शेततळे योजनेचे ऑनलाइन पोर्टल गेल्या तीन आठवड्यापासून बंद असल्याने इच्छुक शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शेततळ्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया करावी लागते. आपले सरकार या वेबसाईटवर गेल्यास जिल्हा, तालुका व गावांची नावेच येत नसल्याने इच्छुक शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली आहे.

कळंब तालुक्यात गेल्या चार वर्षांत ४६३ शेततळे बांधण्यात आले आहेत. तालुक्यात सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेती व्यवसायही अडचणीत आला आहे. परिणामी शेतकरी शेततळ्याच्या माध्यमातून पिकांना पाणी देत आहेत. तत्कालीन फडणवीस सरकारने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. त्यातून शेतकरी शेतामध्ये शेततळे करण्यासाठी पुढे येत आहेत.

कळंब तालुक्यात दरवर्षी दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे शेतीव्यवसाय अडचणीत आला असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे दुष्काळात शेततळ्याचे महत्त्व लक्षात येते. शेतकऱ्यांना कमी पाण्यात पिके घेता यावीत, यासाठी तत्कालीन सरकारने मागेल त्याला शेततळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अनुदान दिले जाते. सुरवातीच्या काळात या योजनेला शेतकऱ्याचा फारसा प्रतिसात मिळाला नाही; मात्र काही शेतकऱ्यांनी योजनेतून शेततळे बांधून त्यांना प्रत्यक्षात झालेला फायदा पाहून शेततळी बांधण्याकडे शेतकऱ्याचा कल वाढला आहे.

फेब्रुवारी २०१६ पासून या योजनेला सुरवात झाली. तालुक्यातील एक हजार २०० शेतकऱ्यांनी आपले सरकार या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केली होती. यापैकी ४६३ शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले होते. त्यांना कृषी विभागाकडून कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. चार वर्षांत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ४६३ शेततळे बांधले असून, सात शेततळ्यांचे अनुदान शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. 

ऑनलाइन पोर्टल बंद, शेतकरी चिंतेत 
दरम्यान गेल्या तीन आठवड्यांपासून शेतकरी शेततळ्यासाठी आपले सरकार या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी झटत आहेत. वेबसाईट ओपन होते; परंतु जिल्हा, तालुका व गावांची नावे येत नसल्याने शेततळे बांधण्यासाठी इच्छुक असलेले शेतकरी चिंतेत सापडले आहेत. 
कळंब तालुका सतत दुष्काळाने होरपळत आहे. काही वर्षे अशा स्थितीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे दुष्काळात शेततळ्याचे महत्त्व लक्षात येत असल्याने शेततळे बांधण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. 
 

Web Title: News about osmanabad

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com