गोव्याचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंतांची निवड तर सुदिन ढवळीकर आणि विजय सरदेसाई यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ 

गोव्याचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंतांची निवड तर सुदिन ढवळीकर आणि विजय सरदेसाई यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ 

 पणजी : गोव्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (मंगळवार) पहाटे दोनच्या सुमारास शपथ घेतली. राजभवनावर राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर आणि "गोवा फॉरवर्ड'चे नेते विजय सरदेसाई यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
मुख्यमंत्रिपदी असताना मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्याने नव्याने सरकार स्थापन करावे लागले आहे. 40 सदस्यांच्या विधानसभेत तीन जागा रिक्त होत्या, तसेच पर्रीकरांच्या निधनामुळे आणखी एक जागा रिक्त झाली. त्यामुळे सध्या भाजपचे 12 सदस्य असून, त्यांना सत्ता स्थापनेसाठी किमान 19 सदस्यांची गरज होती. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 3, "गोवा फॉरवर्ड'चे 3 आणि तीन अपक्षांचा पाठिंबा भाजपला हवा होता. कालपासून भाजपने विधिमंडळाच्या नव्या नेत्याचा शोध सुरू केला होता. विधानसभेत स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपने ठरवलेल्या नावांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत बैठक घेऊनही मतैक्‍य झाले नव्हते. 

पर्रीकर यांच्या निधनानंतर 14 सदस्य असलेल्या कॉंग्रेसनेही लगेचच सत्तास्थापनेसाठी दावा दाखल केला होता, त्यामुळे राज्यातील पेच आणखी वाढला होता. विधानसभेची निवडणूक 2017 मध्ये झाल्यानंतर भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असतील तरच पाठिंबा देऊ अशी अट घातली होती, त्यामुळे पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर पुन्हा पाठिंब्याची पत्रे घेण्याची वेळ भाजपवर आली. ती मिळवताना घटक पक्षांच्या नेत्यांचे मन वळवण्याची कसरत त्यांना करावी लागली. काही मंत्रिपदे, महामंडळाची अध्यक्षपदे याशिवाय अन्य मागण्याही भाजपला मान्य कराव्या लागल्याची चर्चा आहे. 

दोनापावल येथील हॉटेलवर काल सुरवातीला गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी भाजपच्या आमदारांची एकेक करून मते जाणून घेतली. त्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या आमदारांशी त्यांनी चर्चा केली. एकत्रितपणे आलेल्या पाच आमदारांशी त्यानंतर चर्चा करण्यात आली. त्या चर्चेला सांग्याचे आमदार प्रसाद गावकर आले नव्हते. ते कोल्हापूरला गेल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नंतर काही वेळाने माजी मंत्री आतनासिओ मोन्सेरात हे गावकर यांना घेऊन आले होते. मात्र, पहाटेपर्यंत मुख्यमंत्रिपदाच्या नावावर मतैक्‍य झाले नव्हते. 

बैठकींचे हे सत्र आजही सुरू राहिले. सुरवातीला काही नावे चर्चेत होती, त्यापैकी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे व सभापती सावंत यांचीच नावे चर्चेत असल्याची माहिती दुपारी मिळाली. गडकरी यांनी चर्चेच्या अनेक फेऱ्या घेतल्या आणि दुपारी सावंत यांच्या नावावर भाजपने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केले. 

त्यानंतर सावंत यांच्या नावाबाबत घटक पक्षांचे मतैक्‍य करण्याचे काम गडकरी यांनी सुरू केले. त्यात त्यांना सुरवातीला यश आले नाही. सायंकाळी उशिरा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेही बैठकांत सहभागी झाले. त्यांनीही दिल्लीला परत निघण्यापूर्वी रात्री नऊ वाजता मुख्यमंत्र्यांचे नाव घोषित केले नाही, ते जाताना मुख्यमंत्र्यांचे नाव गडकरी जाहीर करतील असे म्हणाले. भाजपला पाठिंब्याची पत्रे दिल्यानंतर राज्यपालांनी डॉ. सावंत यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानंतर आज पहाटे दोनच्या सुमारास शपथविधी सोहळा पार पडला. पहाटे शपथविधी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकूण 12 जणांचा शपथविधी यावेळी झाला.

मृदुभाषी व कर्तव्यकठोर 
डॉ. प्रमोद सावंत हे पर्रीकर मुख्यमंत्री असताना राज्य विधानसभेचे सभापती होते. ते पेशाने आयुर्वेदिक डॉक्‍टर आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. पहिल्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही; मात्र नंतर ते पाळी (आताच्या साखळी) मतदारसंघातून निवडून आले. 24 एप्रिल 1973 रोजी जन्मलेल्या प्रमोद यांनी कोल्हापुरातून आयुर्वेदातील पदवी घेतली. काही काळ त्यांनी उसगाव येथे दवाखानाही चालवला होता. त्याशिवाय ते समाजसेवेसाठी संस्थाही त्याकाळी चालवत होते व आजही चालवतात. समाजसेवेतील पदव्युत्तर पदवीही त्यांनी पुणे विद्यापीठातून मिळवली आहे. मृदुभाषी पण कर्तव्यकठोर म्हणून ते ओळखले जातात. 

गोव्याचे मंत्रिमंडळ : 
डॉ. प्रमोद सावंत - मुख्यमंत्री
सुदीन ढवळीकर - उपमुख्यमंत्री
विजय सरदेसाई - उपमुख्यमंत्री

मंत्री - 
बाबू आजगावकर, 
रोहण खंवटे, 
गोविंद गावडे, 
विनोद पालयेकर, 
जयेश साळगावकर, मावीन गुदीन्हे, 
विश्वजीत राणे,
मिलींद नाईक, 
निलेश काब्राल

Web Title: Pramod Sawant New Chief Minister of Goa

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com