विठ्ठला, महाराष्ट्राला सुजलाम, सुफलाम आणि संपन्न कर - देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 जुलै 2019

पंढरपूर : सकारात्मक शक्तीचा अविष्कार आषाढी वारीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या सकारात्मक शक्तीचा उपयोग हरित आणि प्रदूषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी करायचा आहे. दुष्काळ मुक्तीच्या कामात निसर्गाची साथ मिळून बळीराजा सुखी संपन्न होऊ दे , राज्यातील विठ्ठलाच्या रूपातील जनतेची आणखी पाच वर्षे सेवा करण्याची संधी मिळू दे , राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे असे साकडे आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पंढरपूर : सकारात्मक शक्तीचा अविष्कार आषाढी वारीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या सकारात्मक शक्तीचा उपयोग हरित आणि प्रदूषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी करायचा आहे. दुष्काळ मुक्तीच्या कामात निसर्गाची साथ मिळून बळीराजा सुखी संपन्न होऊ दे , राज्यातील विठ्ठलाच्या रूपातील जनतेची आणखी पाच वर्षे सेवा करण्याची संधी मिळू दे , राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे असे साकडे आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी ची महापूजा करताना मंदिराच्या बाहेर रांगेत उभा असलेल्या एका दांपत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महा पुजेमध्ये सहभागी होण्याचा मान दरवर्षी दिला जातो. यंदा हा  मान लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेगाव तांडा येथील विठ्ठल मारुती चव्हाण व त्यांच्या पत्नी प्रयागबाई चव्हाण यांना मिळाला.

शासकीय महापूजेचा आधी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची तर नगराध्यक्षा साधना भोसले आणि त्यांचे पती नागेश भोसले यांच्या हस्ते श्री रुक्मिणी मातेची नित्य पूजा करण्यात आली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पहाटे सव्वा दोन वाजता श्रीविठ्ठलाच्या महापूजेला प्रारंभ करण्यात आला. विठ्ठलाच्या मूर्तीवर दूध आणि दही स्नान घातल्यानंतर विठ्ठलाची स्वयंभू मूर्ती विलक्षण दिसत होती. त्यानंतर सावळ्या विठुरायाला पितांबर आणि रेशीम काठ असलेली सुंदर नक्षीकाम केलेला अंगरखा घालण्यात आला. सोन्याचा टोप घालून नंतर तुळशीचे व रंगीबेरंगी फुलांचे आकर्षक हार घालण्यात आले. कपाळी गंध लावून त्यावर तुळशीचे पान लावण्यात आल्यावर राजस सुकुमाराचे रूप अधिकच खुलून दिसू लागले. आरती झाल्यानंतर सर्वांनी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा जयघोष केला. श्री रुक्मिणी मातेची देखील परंपरेप्रमाणे पूजा करण्यात आली.

शासकीय महापूजेनंतर मंदिरातील सभामंडपामध्ये मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. तिथे मंदिर समितीच्यावतीने अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळालेल्या चव्हाण दाम्पत्याचा विठ्ठल रुक्मिणी ची प्रतिमा आणि एसटीचा एक वर्ष मोफत प्रवासाचा पास देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना श्री. फडणवीस यांनी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ
भोसले यांचे नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षात वारकऱ्यांना सोयी देण्याचे काम अतिशय उत्तम प्रकारे झाले असल्याचे सांगून समितीच्या कामाचे कौतुक केले. नमामी चंद्रभागा अभियानातील कामे झाल्यावर चंद्रभागा नदी पूर्वीसारखी निर्मल आणि अविरत वाहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडल्याबद्दल शेतकरी वारकरी महासंघाच्या वतीने अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या हस्ते घोंगडी आणि विणा देऊन श्री फडणवीस यांचा सत्कार केला.

यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे ,जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी मंत्री अनिल बोंडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके ,जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी भाविकांना येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला मान...
यंदा वारकरी प्रतिनिधी म्हणून पूजेचा मान लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव तांडा येथील विठ्ठल मारुती चव्हाण (वय 61) व त्यांच्या पत्नी प्रयागबाई चव्हाण यांना मिळाला. शेतकरी असलेले हे वारकरी दांपत्य 1980 पासून 39 वर्षे सलग पंढरीच्या वारीला येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सोबत आषाढी एकादशीच्या विठुरायाच्या महा पूजेत सहभागी होता आले याचा चव्हाण पती-पत्नीस अत्यानंद झाला.यापुढेही पंढरीची वारी अखंड चालू राहू दे आणि शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना केल्याचे श्री चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: CM Devendra Fadanvis visits Pandharpur on the occasion of Ashadi Ekadashi


संबंधित बातम्या

Saam TV Live