विठुरायाच्या पंढरीला यंदा पुराचा वेढा, पुरानं अनेकांचे संसार उध्वस्त! वाचा पंढरीतल्या पुराची ही परिस्थिती

साम टीव्ही
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

 

  • विठुरायाच्या पंढरीत पाणीच पाणी
  • चंद्रभागेला तब्बल 13 वर्षानंतर पूर
  • 10 हजाराहून अधिक नागरिकांचं स्थलांतर
  • साम टीव्हीचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट 

सोलापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरूं आहे. पावसानं विठुरायाच्या पंढरीलाही सोडलेलं नाही. चंद्रभागेला तब्बल 13 वर्षानंतर पूर आलाय. या पुरानं अनेकांचे संसार उध्वस्त केलेत. 

पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम भाविकांचं श्रद्धास्थान. इथली चंद्रभागा म्हणजे भाविकांसाठी पवित्र गंगा. पण याच चंद्रभागेनं रौद्ररूप धारण केलंय. 

मुसळधार पावसामुळे उजनी, वीर आणि नीरा धरणातून तब्बल तीन लाख क्युसेक पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे चंद्रभागेला तब्बल 13 वर्षानंतर पूर आलाय. 

नदीचं पाणी किनाऱ्यावरच्या वस्त्यांमध्ये शिरलंय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बाजारपेठेतील तळमजल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं चित्र पाहायला मिळतंय

पाहा, साम टीव्हीचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट 

लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या बोटी पाहिल्यानंतर कुणाला विश्वासही बसणार नाही की इथूनच दोन दिवसांपूर्वी वाहनं धावत होती. 

पाण्यामुळे पंढरपूरहून बाहेर जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलीय. सातारा, पुणे, सोलापूर आणि विजापूरला जाणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत. 

पंढरपूरच्या प्रदक्षिणा मार्गावर पाणीच पाणी असल्यामुळं इथल्या नागरिकांना घराबाहेर पडता येत नाहीय. याच भागात बंकटस्वामी मठाजवळील एका घरात वृध्दाचा मृत्यू झाला होता. पाणी असल्यानं मृतदेह बाहेर काढणं शक्यच नव्हतं. अखेर कोल्हापूर मधून आलेल्या वजीर रेसक्यू फोर्सच्या मदतीनं हा मृतदेह बाहेर काढला...

परतीच्या पावसानं सर्वात जास्त हवालदिल झालाय. तो बळीराजा...या पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. माढा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं अपार मेहनतीनं उभी केलेली रोपवाटिका भुईसपाट झालीय.  

आता पाऊस कमी झाल्यानं पाणी हळूहळू ओसरतंय. पण या पुरानं शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या मनावर जे घाव केलेत ते कधीही भरून येणार नाहीत. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live