प्रक्षाळ पूजेच्या निमित्ताने विठुरायाचा थकवा दूर होण्यासाठी आयुर्वेदिक काढा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 21 जुलै 2019

पंढरपूर : यथा देहे तथा देवे, या उक्तीप्रमाणे विठूरायाची काळजी घेण्यासाठी अनोख्या प्रथा-परंपरा आहेत. आषाढी यात्रेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन व्हावे यासाठी अहोरात्र उभा राहिलेल्या विठुरायाचा थकवा दूर व्हावा यासाठी विविध प्रकारच्या वनस्पतींपासून बनवलेला आयुर्वेदिक काढा देवाला दाखवण्याची प्रथा आहे. 

आज प्रक्षाळ पूजेच्या निमित्ताने देवाला लिंबू साखर लावून गरम पाण्याने स्नान घालण्यात आले आणि आयुर्वेदिक काढा दाखवण्यात आला. आपण जशी वेगवेगळ्या ऋतू मध्ये आरोग्याची काळजी घेतो त्याच पद्धतीने विठुरायाची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रथा परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहेत.

आषाढी आणि कार्तिकी यात्रेत जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर अहोरात्र उघडे ठेवले जाते. सतत उभा राहून देवाची पाठ दुखू नये यासाठी विठुरायाच्या मूर्तीच्या पाठीमागे लोड ठेवला जातो. देवाचा झोपण्याचा पलंग  काढून ठेवला जातो. आषाढी यात्रा झाल्यावर प्रक्षाळ पूजा केली जाते. या दिवशी संपूर्ण मंदिर धुतले जाते. देवाचा थकवा दूर व्हावा यासाठी देवाला लिंबू साखर लावून गरम पाण्याने स्नान घातले जाते. रात्री लवंग, वेलदोडे, जायफळ, सुंठ, दालचिनी, मिरे आदी विविध वनस्पतींपासून बनवलेला आयुर्वेदिक काढा दाखवला जातो.

उन्हाळ्यामध्ये देवाच्या अंगाचा दाह होऊ नये यासाठी चंदन उटी पूजा केली जाते. थंडीमध्ये दररोज रात्री शेजारती च्या वेळी देवाच्या मूर्तीच्या दोन्ही कानावरून मुलायम कापडाची पट्टी गुंडाळली जाते. ऋतुमानानुसार देवाला दाखविण्यात येणाऱ्या महाप्रसादात देखील बदल करण्याची प्रथा आहे.

Webtitle : marathi news pandharpur viththal prakshal pujan in temple god served with ayurvedic kadha

संबंधित बातम्या

Saam TV Live