दक्षिण मुंबईतील मतदार युतीला तारणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 एप्रिल 2019

तुलनात्मक मतदान 
- 2014 : 52.49 टक्के 
- 2019 : 52.15 टक्के

मुंबई  : दक्षिण मुंबईतील मुंबादेवी आणि कुलाब्यातील कमी मतदान व शिवडी, वरळी परिसरातील जास्त मतदान युतीच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहेत. मलबार हिल भागातील उच्चभ्रू वर्गाचे मतदान या मतदारसंघांत निर्णायक ठरू शकेल. 

उच्चभ्रू व मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 52.15 टक्के मतदान झाले. कॉंग्रेसचे पारंपरिक मतदार असलेल्या मुंबादेवी, कुलाबा परिसरात या वेळी कमी मतदान झाले. ही बाब कॉंग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात जाण्याची शक्‍यता आहे. या भागातील मुस्लिम मते यापूर्वी निर्णायक ठरत होती; मात्र मतदारसंघ फेररचनेत शिवडी विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबईत आल्यापासून येथील गणिते बदलली. या वेळी तुलनेने मलबार हिल, भायखळा आणि शिवडी या भागांत अधिक मतदान झाले. 

मलबार हिल भागात 56 टक्के मतदान झाले. भायखळा परिसरातील मतदारांचा प्रतिसाद युती व आघाडीसाठी संमिश्र असल्यामुळे मलबार हिल येथील उच्चभ्रू, गुजराती, राजस्थानी मतदान निर्णायक ठरणार आहे. चिराबाजार, गिरगाव, खेतवाडी, ग्रॅंट रोड, मुंबई सेंट्रल, लालबाग, शिवडी या भागांतील मतदानाचा टक्का 'जैसे थे' राहिला. त्यामुळे युतीत आनंदाचे वातावरण आहे. मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना विरोध करून अप्रत्यक्षपणे आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवडी व वरळी येथील मनसेची किती मते कॉंग्रेसला मिळतील, ही बाबही महत्त्वाची ठरणार आहे. 

तुलनात्मक मतदान 
2014 : 52.49 टक्के 
2019 : 52.15 टक्के


संबंधित बातम्या

Saam TV Live