डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 13 वर्षिय मुलीचा मृत्यू

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 13 वर्षिय मुलीचा मृत्यू

पिंपरी - चुकीच्या पद्धतीने इंजेक्‍शन देऊन मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्‍टरवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल झाला आहे, ही घटना बावधन येथे घडली.

प्रज्ञा अरुण बोरुडे (वय 13, रा. बावधन, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. डॉ. जाधव (रा. रामकृष्ण क्‍लिनिक, रमाबाई आंबेडकर चौक, सिद्धार्थनगर, बावधन, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्‍टरचे नाव आहे. सहायक पोलिस निरीक्षक आनंद पगारे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 सप्टेंबर 2017 रोजी प्रज्ञा हिला थंडी ताप आल्याने तिला बावधन येथील रामकृष्ण क्‍लिनिकमध्ये उपचारासाठी आणले. तपासणी केल्यानंतर डॉ. जाधव याने प्रज्ञाच्या उजव्या कमरेवर एक इंजेक्‍शन दिले आणि काही गोळ्या देऊन घरी सोडले. थोड्या वेळेतच प्रज्ञाला इंजेक्‍शन दिलेल्या जागी आणि उजव्या मांडीवर, कमरेवर आणि पाठीवर काळे चट्टे व फोड आले. त्यामुळे तिला त्वरित उपचारासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, काही वेळेत प्रज्ञाची प्रकृती आणखी खालावली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

प्रज्ञा हिच्या मृत्यूला डॉ. जाधव हेच कारणीभूत असून त्यांनी चुकीच्या पद्धतीने इंजेक्‍शन दिल्याचा आरोप अरुण बोरुडे यांनी केला. याबाबत त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली. यामुळे पोलिसांनी बोरुडे यांचा जबाब आणि डॉ. जाधव याने केलेल्या उपचारांची कागदपत्रे ससून रुग्णालयाच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या समितीसमोर सादर केली. या समितीने दिलेल्या अहवालात, "इंजेक्‍शन दिल्याच्या जागी, कमरेवर, मांडीवर आणि पाठीवर काळे चट्टे व फोड येणे, ही इंजेक्‍शन चुकीच्या पद्धतीने दिल्याची लक्षणे आहेत. इंजेक्‍शन दिलेल्या जागेवरून झालेल्या जंतू प्रादुर्भावामुळे प्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. यात डॉ. जाधव याने हलगर्जीपणा केला आहे.' असे म्हटले आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर प्रज्ञा हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉ. जाधव विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: 13 year old girl dies due to doctor's defamation

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com