डोंगरीतील इमारत खेकड्यांनी पाडली असेही जाहीर करा - अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 जुलै 2019

पिंपरी : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण खेकड्यांनी फोडल्याचे वक्तव्य मंत्र्यांनी केल्यानंतर आता मुंबईतल्या डोंगरी भागात कोसळलेली इमारतही खेकड्यांमुळेच पडली असल्याचे जाहीर करून टाका, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगाविला आहे.

पिंपरी : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण खेकड्यांनी फोडल्याचे वक्तव्य मंत्र्यांनी केल्यानंतर आता मुंबईतल्या डोंगरी भागात कोसळलेली इमारतही खेकड्यांमुळेच पडली असल्याचे जाहीर करून टाका, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगाविला आहे.

तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटले, असे वक्तव्य जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. त्याचाच संदर्भ घेत अजित पवारांनी आता डोंगरी इमारत दुर्घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. पाच वर्षापूर्वी निवडणूकीला सामोरे जाताना टोलमुक्‍तीचे आश्‍वासन भाजपने दिले होते. आता त्यांचेच नेते टोलमुक्‍ती शक्‍य नसल्याचे दिल्लीत सांगत आहेत. त्यामुळे टोलमुक्‍तीच्या आश्‍वासनाचे काय झाले, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी ते पिंपरी चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पवार म्हणाले, "गेल्या तीन वर्षापासून युतीचे सरकार शेतक-यांना कर्जमुक्‍तीचे आश्‍वासन देत आहे. आताही 31 ऑक्‍टोबर पर्यंत अर्ज देण्याचे आवाहन केले आहे. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी दाखविण्यात आलेले हे गाजर आहे. शिवसेना एकीकडे सत्तेत मांडीला मांडी लावून बसत आहे आणि दुसरीकडे पीकविम्यासाठी मुंबईत मोर्चा काढून शेतक-यांचे कैवारी असल्याचे नाटक करीत आहे. विधानसभेच्या अधिवेशनात त्यांची दातखिळ का बसते, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.
भाजपने दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले होते. गेल्या पाच वर्षात किती जणांना रोजगार दिला याची आकडेवारी त्यांनी जाहीर करावी. मंदी आणि बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यावर साडेचार लाख कोटींचे कर्ज झाले आहे. लोकसभा निवडणूकीनंतर पाच लाख कोटी रुपयांचे मार्केट गडगडल्यामुळे अनेकांना नुकसान झाले.

पवार म्हणाले, "लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडण्याचे काम भाजप करीत असून ते लोकशाहीला घातक आहे. राज्यात होणा-या निवडणूकीत समविचारी पक्षांना सोबत घेणार आहोत. भाजप इतर पक्षांच्या नेत्यांना प्रलोभन दाखवून आपल्याकडे खेचत आहे. कॉंग्रेससोबत आघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. मागील निवडणूकीत ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवार दुस-या क्रमांकावर आहे त्याला ती जागा देण्याबाबतचे ठरले आहे. लोकसभेला मोदींची सुप्त लाट होती. मात्र त्यांची ही छाप राज्यात दिसत नाही. यामुळे विधानसभेच्या निवडणूकीला मोठ्या ताकदीने सामोरे जाणार आहोत.

राज्यात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या
इव्हीएम मशीनबाबत अनेकजणांनी शंका उपस्थित केली आहे. जगातील अनेक विकसित देशांमध्ये बॅलेटपेपरवर निवडणूका घेतल्या जातात. राजकीय नेते आणि नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी राज्यातही बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला काहीच हरकत नसल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Web Title: NCP leader Ajit Pawar attacks maharashtra government on dongri incident


संबंधित बातम्या

Saam TV Live