दीड तासांचा विमान प्रवास आणि नवी राजकीय समीकरणं..

दीड तासांचा विमान प्रवास आणि नवी राजकीय समीकरणं..

पुणे : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संभाव्य आघाडीत मनसेचा करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे दोघेही एकाच विमानाने औरंगाबादहून मुंबईला विमानाने एकत्र आले.

या दीड तासांच्या प्रवासानंतर अनेक नवीन राजकीय समीकरणे बनणार असल्याचा आणि काहींची ठरलेली समीकरणे बिघडणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली. 

भाजपच्या विरोधात वातावरण तापविण्यासाठी राज ठाकरे यांची शैली आणि दारूगोळा उपयुक्त ठरू शकेल, असा राष्ट्रवादीचा होरा आहे. त्यासाठी शरद पवार आणि राज ठाकरे हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. राज यांनी जानेवारीमध्ये पवारांची मुलाखत घेतल्यानंतर या दोघांतील जवळीकता आणखी वाढली. त्यानंतर अनेक औपचारिक आणि अनौपचारिक प्रसंगी ते भेटत राहिले. त्यामुळेच दोन्ही काॅंग्रेसच्या आघाडीत मनसे येणार असल्याचे बोलले जाऊ लागले. त्यात आता पुन्हा दोन्ही नेते प्रवासात एकत्र आल्याने साहजिकच त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.  

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 50 ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना गेल्या विधानसभा निवडणुकीत 25 ते 75 हजार मते मिळाली आहेत. गेल्यावेळी मोदी लाट असतानाही मनसेला मिळालेली मत लक्षणीय होती. आता त्याच ठिकाणी 35-40 हजार मतेही टिकवून ठेवली तरी, आघाडीला त्याचा आधार होऊ शकेल, असा होरा मांडण्यात येत आहे.

सध्याच्या वातावरणातही राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होत आहे. त्यात युवकांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळेच मनसेला आघाडीत घेऊ अन काही जागा देऊ, त्या मोबदल्यात राज ठाकरे यांच्या सभा राज्यात विविध ठिकाणी घेऊ, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे. त्यातही राज यांना मुंबई, पुणे आणि नाशिकमध्येच काही जागा हव्या आहेत. किमान 10-15 आमदार निवडून आणता आले तरी पक्षाचा विस्तार पुन्हा होऊ शकतो, असा कयास आहे.

राष्ट्रवादीतील काही नेते मनसेच्या "हाता'त "घड्याळ' बांधण्यास इच्छूक आहेत तर, कॉंग्रेसमधील एका गटालाच फक्त मुंबईची भीती वाटत आहे. राज यांच्यामुळे परप्रांतियांची मते तर हिरावणार नाही ना, असे त्यांना वाटते. पण, दुसरा गट म्हणतो की, एकेकाळी कॉंग्रेसला शिवसेनाचा पाठिंबा होता तर, आता मनसेची मदत घेण्यास काय हरकत, असा त्यांचा सवाल आहे.

याबाबत मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस  यांनी सांगितले की मनसेची ताकद राज्याच्या अनेक भागांत आहे, हे कोणीही नाकारत नाही. त्यामुळे संभाव्य आघाडीबाबत आमच्या पक्षाच्या नेत्यांची दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे, सध्या तरी इतकेच सांगता येईल. कोणत्या शहरातील किती जागा आणि तपशील, हे या बाबतची भूमिका आमचे नेते लवकरच बोलतील.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com