गोव्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा

गोव्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सरकारचा कारभार सुरळीत करण्यासाठी कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पर्रीकर अनारोग्याच्या कारणांमुळे काही खात्यांचा कारभार सहकारी मंत्र्यांकडे सोपवणार, उपमुख्यमंत्रीपदी सुदिन ढवळीकर यांना नेमणार की मुख्यमंत्रीपदावरून तात्पुरते दूर होत भाजपच्या अन्य आमदाराकडे नेतृत्व सोपवणार अशा शक्यता चर्चेत आल्या आहेत. मात्र याबाबत सध्या कोणतीही माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली नाही. दरम्यान काल रात्री उशिरा पर्रीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दूरध्वनीवरून राजकीय वातावरणाची कल्पना दिली.

नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी पर्रीकर यांना इस्पितळात भेटून परत येताना पत्रकारांशी बोलताना भाजपचे निरीक्षक उद्या येतील असे सांगितल्याने नेतृत्व बदलाची चर्चा काल दुपारनंतर सुरु झाली. मात्र. भाजपचे प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी तसे कोणते निरीक्षक येणार असल्यास आपणांस त्याची माहिती नाही, असे सांगितले. ते म्हणाले, पर्रीकर अमेरीकेतून आल्यावर ते दिल्लीला जाणार होते. तेथे काही नेत्यांना ते भेटणार होते. ते नेते कदाचित भेट घेण्यासाठी राज्यात येऊ शकतात.

पर्रीकर यांना पचनाविषयी त्रास पुन्हा जाणवू लागल्याने गुरुवारी उत्तर गोव्यातील कांदोळी येथील दुकळे इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तेथून आज त्यांना अमेरिकेला पून्हा हलवले जाणार अशी चर्चा सुरु झाली असतानाच त्यांनी काल दुपारी पर्रा येथे मूळ घरी जात गणपतीचे दर्शन घेतले. तेथून ते इस्पितळात परत आल्यावर या राजकीय नाट्याला सुरवात झाली. सुरूवातीला नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई मुख्यमंत्र्यांना येऊन भेटले. त्यांच्यापाठोपाठ भाजपच्या प्रदेश गाभा समितीचे सदस्य त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर हे मुख्यमंत्र्यांना येऊन भेटले. अपक्ष आमदार असलेले महसूलमंत्री रोहन खंवटे आणि आदिवासी कल्याणमंत्री गोविंद गावडे हेही मुख्यमंत्र्यांना भेटले.त्यामुळे नेतृत्वबदलाविषयी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती प्रसारीत होऊ लागली. मात्र त्याबाबत अधिकृतपणे कोणी काही सांगितले नाही.

निरीक्षक येईल - सरदेसाई
नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई म्हणाले, उद्या भाजपचा निरीक्षक येईल. त्याच्याशी चर्चा केल्यावर चित्र स्पष्ट होईल. कोणी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आहे का याची आम्हाला आता कल्पना नाही. मुख्यमंत्र्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आज दिसले.

तो भाजपचा निर्णय - ढवळीकर
सरकारच्या नेतृत्वाबाबत जर कोणता निर्णय घ्यायचा असल्यास तो भाजपने घ्यावा लागेल. ते घेतील तो निर्णय मला मान्य असेल. राज्यात नेतृत्वबदल होईल असे मला वाटत नाही असे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

सर्व पर्याय खुले
मिळालेल्या माहितीनुसार उपचारासाठी राज्याबाहेर दीर्घ काळ रहावे लागल्यास मागून कोणती प्रशासकीय व्यवस्था असावी याचा निर्णय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतला आहे. त्याबाबत त्यांनी मंत्रिमंडळातील सहकारी व पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. ती चर्चा नेमकी काय होते हे येत्या दोन दिवसातच उघड होणार आहे. त्यासाठी दिल्लीतील निरीक्षका्ंची प्रतीक्षा आहे.

मगोच्या विलीनीकरणाची चर्चा
सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर हे उपमुख्यमंत्री होण्यासाठी मगो पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र या प्रस्तावाला मगोचे सरचिटणीस लवू मामलेदार यांचा विरोध असून एकटे ढवळीकर मगोच्या विलीनीकरणाचा निर्णय घेऊ शकत नाहीत. 

Web Title: marathi news politics tension in goa manohar parrikar health problems  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com