प्रियांका गांधीच कॉंग्रेसची नवीन आशा ?

प्रियांका गांधीच कॉंग्रेसची नवीन आशा ?

सोनभद्रमध्ये घडलेला नरसंहार. बहुतेकांनी दुर्लक्ष केलेल्या या घटनेला अचानक देशपातळीवर महत्त्व आले, ते प्रियांका गांधी यांच्या आंदोलनाने. त्यांना भेटण्यास जाऊ देण्यापासून रोखण्याचे कारण नव्हते, पण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची झालेली चूक आणि प्रियांकांनी घेतलेली भूमिका यामुळे या घटनेकडे देशाचे लक्ष वेधले. भाजप सरकारचा कारभारावर प्रश्‍नचिन्ह उभारले. राहूल गांधी यांच्या पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर मरगळलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उभारी आली. प्रियांका कॉंग्रेसची नवी आशा ठरली. 

नेहरू-गांधी फॅमिलीभोवतीच कॉंग्रेस गेली सात-आठ दशके फिरत आहे. पक्षाची रचनाच अशी झाली आहे, की त्यांच्या नेत्यांचा परस्पर विश्‍वास नाही. त्यातच कोणी नेता देशपातळीवर उभारूही शकला नाही. आताही देशात भाजपनंतर कॉंग्रेसच आहे. विरोधी पक्ष म्हणून लढाई कशी लढायची, हे मात्र ते शिकलेलेच नाहीत. सत्तेभोवती फिरणाऱ्या नेत्यांचे कोंडाळे या पक्षात जमत गेले. मतदारांनी गेल्या दोन निवडणुकात कॉंग्रेसला नाकारल्याने, सत्तेभोवती फिरणाऱ्या कोंडाळ्यातील अनेकजण पराभूत झाले, तर काहीजणांना सत्ताधारी पक्षात स्थान मिळाले. उर्वरीत कॉंग्रेसला सक्षम नेत्याची गरज आहे. त्यामुळे राहुलनंतर प्रियांकावर त्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 

प्रियांका ही गांधी परिवारातील शहजादी. गेली दोन दशके त्यांनी रायबरेली व अमेठी मतदारसंघ निवडणुकीच्या काळात सांभाळला. तरीदेखील निवडणुकीच्या राजकारणात थेट उतरण्याचे टाळले. मात्र, यंदा फेब्रुवारीत लोकसभा निवडणुकीपूर्वी त्या पक्षाच्या सरचिटणीस झाल्या. पूर्व उत्तरप्रदेशाची जबाबदारी त्यांच्यावर होती. 

प्रियांकांची प्रचाराची धाटणीच वेगळी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आश्‍वासक हास्य. समोरच्याचे ऐकून घेण्याची मानसिकता. सर्वसामान्यात सहजपणे मिसळण्याची पद्धत. जनतेच्या लहानसहान समस्या मांडत, थेट भाजप सरकारवर हल्ला करण्याची हातोटी. प्रश्‍नांना उत्तरे देताना इन्टंट आणि चपखल प्रतिक्रिया देण्याची कला. परिस्थिती लक्षात घेत तातडीने निर्णय घेण्याची क्षमता व त्याच्या अंमलबजावणीची दृढता. बुद्धीबळातील खेळाप्रमाणे समोरच्या चालीला मात देणारी प्रतिचाल रचण्याचे चातुर्य. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वारंवार जाणवत राहिला. माध्यमांना इच्छा असो अथवा नसो, त्यांची दखल घ्यावीच लागली. 

प्रियांका गांधी यांच्या ताज्या भेटीकडे लक्ष दिल्यास, त्याच्या विकसित होत चाललेल्या नेतृत्व गुणाचा परिचय होतो. सोनभद्र जिल्ह्यातील घटना बुधवारी (17 जुलै) सकाळी घडलेली. गोंड आदिवासी समाजाचे लोक कसत असलेल्या जमिनीवर कब्जा मिळविण्यासाठी तेथील सरपंचाने लोकांसह केलेला हल्ला. दहाजण मृत्युमुखी पडले, 28 जण जखमी झालेले. त्या उभ्भा गावावर शोककळा पसरलेली. प्रियांकाचे आगमन अचानक वाराणसीत होते. त्या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाला, महिलेला भेटतात. त्याच्या उपचाराकडे नीट लक्ष देत नसल्याचे सांगत, त्या थेट निघतात, ते त्या गावाकडे पिडितांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी. 

प्रशासन हादरून जाते. दोन-तीन तासांत निर्णय घेताना, त्यांनीही नेहमीप्रमाणे प्रियांकाना अडविले. हेही सर्वत्र घडते, तसेच घडले. मात्र, प्रियांकांनी कायदा सांगत अधिकाऱ्यांकडे आदेशाची मागणी केली. अधिकारी नेहमीप्रमाणे निरुत्तर. प्रियांकांनी रस्त्यावरच धरणे धरले. पोलिसांनी अटक करण्याची व व्यक्तिगत जामीनावर सुटका करून घेण्याची सूचना त्यांना केली. मात्र, प्रियांकाचा त्याला नकार. कलम 144 नुसार जमावबंदी असल्याच, पाचजणांना जाता येईल. आम्ही तिघे-चौघेच जाऊन भेटतो, अशी प्रियांकाची सूचना. 

पेच वाढत चालला. अटक केल्यावर त्या कारागृहातच थांबल्यास, राजकीय लाभ कॉंग्रेसला होण्याची शक्‍यता. माध्यमांचेही लक्ष तेथे वेधले गेले. कार्यकर्ते, सर्वसामान्य लोकांचा जमाव होऊ लागला. प्रशासनाने तेथून त्यांना विश्रामगृहात नेले. कशासाठी अडवित आहात, या प्रियांका यांच्या प्रश्‍नाला, तसेच पिडितांना भेटल्याशिवाय जाणार नसल्याच्या त्याच्या हटवादी भुमिकेपुढे प्रशासन निरुत्तर झाले. 

प्रियांका समुदायाशी बोलताना म्हणाल्या, "मुख्यमंत्री, मंत्री कोणीही त्यांना भेटण्यास गेले नाही. नरसंहार होतो. कोणीही लक्ष देत नाही. कायदा व सुव्यवस्था आहे का, ते सरकारला विचारा. त्यांची विचारपूस करण्यास मी चालले, तर अडवणूक होते. कोणत्या कारणाने पकडले, तेही सांगत नाहीत.'' त्या रात्रभर तिथेच आंदोलन करीत थांबल्या. या काळात त्यांच्या बेकायदा पकडल्याबद्दल कॉंग्रेस नेते देशभर प्रतिक्रिया व्यक्त करू लागले. 

प्रशासनाने सायंकाळी त्यांना सांगितले, की तुम्हाला अटक केलेली नाही. त्यावर त्या उत्तरल्या, "मग मी भेटायला जाऊ.' प्रशासनाने योग्य जागा ठरवावी, तेथे त्या लोकांना आणावे, मी भेट घेईन, या त्यांच्या सुचनेमुळे प्रशासन पुन्हा हतबल. 

याच काळात त्यांना पिडितांच्या कुटुंबाला पक्षातर्फे दहा लाख रुपये देण्याचे जाहीर केले. स्थानिक प्रशासनाबरोबरच लखनौ, दिल्लीतील प्रशासनही सक्रीय झाले. तपासाविषयी वेगवेगळ्या घोषणा होऊ लागल्या. ही घटना कॉंग्रेसने 1955 मध्ये घेतलेल्या निर्णयाने झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रियांका प्रत्युतरात म्हणाल्या, "जवाहरलाल नेहरू मुख्यमंत्री नाहीत. तुमचे सरकार आहे. तुम्ही गरीबांवरील हल्ले रोखण्यासाठी काय करीत आहात.' 

दरम्यान, त्या गावातील लोकच त्यांना भेटण्यासाठी चुनार विश्रामगृहापाशी पोहोचतात. पोलिस त्यांना अडवितात, तेव्हा "तुम्ही त्यांना येऊ द्या, अन्यथा मी त्यांच्याकडे जाते. कोणत्या कारणाने तुम्ही अडवित आहात,' असा आक्रमक पवित्रा प्रियांकानी घेतला. शेवटी त्या भेटल्या, तेव्हा त्या वृक्षाखाली मोकळ्या जागेत, त्या गावांतील महिला त्यांच्या गळ्यात पडून भावनांना मोकळी वाट देत रडल्या. प्रियांका त्यांच्याशी संवाद साधत राहिल्या. 

माध्यमांसाठी हा मोठा इव्हेंटच ठरला. सोनभद्रची घटना देशपातळीवर पोहोचली. याचे राजकीय लाभ कोणाला, कसे होतील, ते फारसे महत्त्वाचे नाही. तेथे उपस्थित असलेल्या एका युवकाची प्रतिक्रिया बोलकी होती. तो म्हणाला, ""मी कॉंग्रेसचा नाही. पण प्रियांका गांधी आमच्यासारख्या गरीबाचा आवाज उठवित आहेत. त्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यास आलो.'' पिडीत गावातील गावकरी म्हणाला, ""त्या दिल्लीहून हजार किलोमीटर अंतर कापत आम्हाला भेटण्यास आल्या. मग आम्ही त्यांच्यासाठी तीस किलोमीटर अंतर येऊ शकत नाही का?'' 

"मी पुन्हा येईन,' असे सांगून प्रियांका गांधी तेथून परत निघाल्या, अन्‌ प्रशासनाने सुटकेचा सुस्कारा सोडला. तृणमूल खासदारांचे शिष्टमंडळ कलकत्ता विमानतळावर अडविले. कॉंग्रेस, समाजवादी, बसपच्या नेत्यांना अडविण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्या गावाला जाणार असल्याचे जाहीर झाले. मात्र, खरी बाजी मारली ती प्रियांका यांनीच. 

कर्नाटकात भाजपची सत्ता मिळविण्यासाठी चाललेली धावपळ, गोव्यात कॉंग्रेसमध्ये फूट पाडण्याची चाल आणि सोनभद्र मधील ही घटना. गेल्या आठवड्यातील या ठळक घडामोडी. मात्र, सर्वसामान्यांकडे भाजप सरकारचे होत असलेले दुर्लक्ष प्रियांका यांनी चव्हाट्यावर आणले. त्यांना उत्तर प्रदेशात मोठा पल्ला गाठायचा आहे. 

उत्तर प्रदेशात ऐशी खासदारचा कॉंग्रेसच्या एकमेव खासदार सोनिया गांधी. विधानसभेतही त्यांचे 403 पैकी केवळ सात आमदार. लोकसभेला पक्षाला राज्यात मतेही मिळाली केवळ सहा टक्के. केवळ आठ विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांना आघाडी मिळालेली. विधानसभेच्या गेल्या चार निवडणुकांतही त्यांच्या आमदारांची संख्या 25 च्या आसपास राहिली. अशा खडतर प्रदेशात पक्षाला पुन्हा उभारण्याचे आव्हान प्रियांकांनी स्विकारले आहे. त्यात त्या किती यशस्वी होतील, ते कोणालाही सांगता येणार नाही. 

मात्र, वेगळ्या पद्धतीने प्रश्‍नाला सामोरे जाण्याची हातोटी. जनतेशी संवाद. सर्वसामान्यांचे प्रश्‍न मांडण्याची पद्धत. यामुळे प्रियांकाचे वेगळेपण दिसू लागले आहे. सक्रिय राजकारणात त्यांच्या प्रवेशाला सहाच महिने झाले आहेत. या प्रकारे त्या नेतृत्व करू लागल्या, तर कॉंग्रेसजनात त्या नव्या आशेचा किरण ठरतील. 

Web Title: Priyanka Gandhi is like new hope for the Congress

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com