गटारांवरील चेंबरमधूनही पैसे कमविले जाऊ शकतात?

गटारांवरील चेंबरमधूनही पैसे कमविले जाऊ शकतात?

पुणे  - गटारांवरील झाकणातूनही (चेंबर) पैसे कमविले जाऊ शकतात? कधी ऐकिवात नसावे; पण तेही घडते आहे. ही झाकणे रस्त्यापासून खाली-वर झाल्याने त्यांची समपातळी करण्यासाठी महापालिकेने तब्बल ४० लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. त्यात, एका झाकणाचा खर्च एक लाखाच्या घरात दाखविला आहे. हा खर्च शनिवार पेठ-सदाशिव पेठ प्रभागाचा (क्र. १५) आहे.

प्रत्यक्षात हा खर्च दीड हजार रुपये आहे. विशेष म्हणजे निविदेनुसार त्या भागातील गल्लीबोळासह प्रमुख रस्त्यांची ‘सकाळ’ने पाहणी केली तेव्हा, जेमतेम ४२ झाकणे धोकादायक असल्याचे आढळून आले. झाकणांच्या या अवस्थेला ठेकेदार कारणीभूत असूनही त्यावर आता पुन्हा लाखो रुपये खर्च होत आहे. अशा प्रकारे शहरभर कामे झाली तर, पुणेकरांचे ८० कोटी रुपये झाकले जाण्याची भीती आहे. 

रस्त्यांवरील ही झाकणे धोकायदाक झाल्याचे सांगत, महापालिकेच्या कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाने या निविदा काढल्या. या निविदेत एकाच कामासाठी वेगवेगळी म्हणजे, चेंबर, झाकणे, जाळ्यांची दुरुस्ती अशी नावे देत, खर्च फुगविला आहे. ही कामेही ऐन पावसाळ्यात करावयाची आहेत. 

या निविदेतील कामे, त्याचा खर्च, ठिकाणे जाणून घेत केवळ झाकणांची प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा, झाकणात एवढा पैसा ओतण्याची गरज नसल्याचे आढळून आले. पथ विभागाच्या हिशेबानुसार ही कामे चार-पाच लाख रुपयांची आहेत असे दिसून आले तर क्षेत्रीय अधिकारी मात्र, त्याच कामावर ४० लाख रुपये उधळत आहेत. 

या प्रभागातील वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर साधारपणे १८ झाकणे अत्यंत धोकादायक आहेत. रस्त्याची बांधणी करताना ठेकेदाराने योग्य ती काळजी घेतली नसल्यानेही ही स्थिती निर्माण झाली आहे. तरीही ठेकेदाराऐवजी नगरेसवकांच्या निधीतून झाकणांची दुरुस्ती करण्याचा घाट घातला आहे. रस्त्यावरील झाकणांची किमान पाच वर्षे तरी दुरुस्ती अपेक्षित नसते. मात्र, बहुतांशी भागात दर वर्षालाच ही  कामे होतात. झाकणाची उंची वाढवायची असेल तर मजूर आणि काही साहित्याचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार झाकण समपातळीत आणण्यासाठी दीड हजार रुपये खर्च येतो. मुळात, झाकणांची उंची कमी-अधिक झाल्यास ही कामे ठेकेदारांनीच केली पाहिजेत, असे पथ विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

निविदा आज उघडणार
शनिवार पेठेतून जयंतराव टिळक पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या शनिवारी (ता. १) रात्री पूर्ण करण्यात आले. त्याआधीच म्हणजे, ३१ मे रोजी या रस्त्यावरच्या झाकणांच्या दुरुस्तीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. रस्त्याचे काम करतानाच येथील झाकणे रस्त्याच्या समपातळीत आणणे शक्‍य होते. त्यासाठी निविदा काढल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण भागातील कामे दोन-चार दिवसांत पूर्ण होऊ शकतात; परंतु एवढा पैसा वापरण्यात येणार असल्याने ती कामे सहा महिन्यांत करण्याचे नियोजन असल्याचे निविदेत म्हटले आहे. या निविदा सोमवारी (ता. १०) उघडण्यात येणार आहेत.

वार्डस्तरीय निधीतून ही कामे करण्यात येणार असून, ती नगरसेवकांनी सुचविल्यानुसार आहेत सुरक्षिततेच्या दृष्टीने सांडपाणी, पावसाळी गटारांवरील झाकणे सुस्थितीत हवीत. त्यासाठी त्यांची दुरुस्ती करण्यात येईल.
- आशिष महाडदळकर, क्षेत्रीय अधिकारी, कसबा- विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय


Web Title: Money from the drainage chamber in pmc

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com