देशांतर्गत हवाई मालवाहतुकीत पुणे विमानतळाने सहाव्या स्थानी मजल मारली..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

पुणे - देशांतर्गत हवाई मालवाहतुकीत पुणे विमानतळाने सहाव्या स्थानी मजल मारली आहे. पुणे विमानतळावरून चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत तब्बल ७२ टक्‍क्‍यांनी मालवाहतूक वाढली आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी दिली आहे.

पुणे - देशांतर्गत हवाई मालवाहतुकीत पुणे विमानतळाने सहाव्या स्थानी मजल मारली आहे. पुणे विमानतळावरून चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत तब्बल ७२ टक्‍क्‍यांनी मालवाहतूक वाढली आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी दिली आहे.

देशांतर्गत हवाई मालवाहतुकीत दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई आणि बंगळूरपाठोपाठ पुण्याने स्थान मिळविले आहे.  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहा महिन्यांत तब्बल ७२ टक्‍यांनी हवाई मालवाहतूक वाढली आहे. इतर विमानतळांच्या तुलनेत ही वाढ सर्वाधिक आहे. याविषयी अजयकुमार म्हणाले, ‘‘मालवाहतुकीसाठी मोठी विमाने उपलब्ध व्हावीत, यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. ही विमाने आणि त्यासाठीची जागा २८ ऑक्‍टोबरच्या सुमारास उपलब्ध होईल. त्यानंतर मालवाहतुकीत आणखी पन्नास टक्‍क्‍यांनी वाढ होईल. पुणे विमानतळावरून एअर इंडियाने नुकतीच मालवाहतूक सुरू केली. पहिल्या फेरीत त्यातून ५५० किलो मक्‍याचे दाणे (बेबी कॉर्न) दुबईला पाठविण्यात आले. अमेरिका, इंग्लंड किंवा युरोपीय देशांत माल पाठविण्यासाठी विशेष विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन एअर इंडिया करीत आहे.’’

उत्पन्नात १६० टक्के वाढ   
देशातील २८ विमानतळांमध्ये सर्वाधिक उत्पन्नाच्या गटात पुणे विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ अहमदाबाद आणि गोव्याचा समावेश आहे. पुणे विमानतळाचे उत्पन्न मागील आर्थिक वर्षात १६० टक्के वाढले. पुणे विमानतळाचे उत्पन्न आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ५६ कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ते १४६ कोटी रुपयांवर गेले. हे उत्पन्न २०१५-१६ मध्ये ३० कोटी, तर २०१४-१५ मध्ये २८ कोटी रुपये होते.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live