पुणेकरांना ऑनलाइन फसवणुक करणार्यांमध्ये यूपी, बिहार आघाडीवर

 पुणेकरांना ऑनलाइन फसवणुक करणार्यांमध्ये यूपी, बिहार आघाडीवर

पुणे - पुणेकरांना ऑनलाइन फसवणुकीद्वारे लाखो रुपयांचा गंडा घालण्यामध्ये उत्तर भारतातील गुन्हेगार आघाडीवर असल्याचे चित्र आहे. सायबर गुन्हे शाखेने गेल्या काही वर्षांत केलेल्या कारवाईत ८० ते ९० टक्के आरोपी हे उत्तर भारतातील असल्याचा पोलिसांचा दावा आहे. यामुळे ऑनलाइन फसवणुकीची पाळेमुळे उत्तर भारतात असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शहरात गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य ते उच्चभ्रू नागरिक, मोठमोठ्या कंपन्या, खासगी-सरकारी कार्यालये यांना ऑनलाइन फसवणुकीचे चटके बसत आहेत. विशेषतः मागील चार ते पाच वर्षांत ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सायबर गुन्हे शाखेकडून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना पकडण्यावर अधिकाधिक भर दिला आहे.

सायबर गुन्हे शाखेने मागील तीन वर्षांत ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना अटक केली. त्यामध्ये बहुतांश आरोपींना राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांमधून अटक केली आहे. या पाच राज्यांमधील काही मोजक्‍याच शहरांमध्ये या आरोपींचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले आहे. काही तरुण वैयक्तिक पातळीवर, तर काही जण एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयाप्रमाणे मोठमोठी कार्यालये थाटून ऑनलाइन फसवणूक करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. 

बंगळुरू, खारघरमध्ये ‘नायजेरियन फ्रॉड’ कर्नाटकमधील बंगळूर व मुंबईजवळील खारघर येथे नायजेरियन नागरिक भारतीय नागरिकांचा उपयोग करून तेल, शेतीसाठीची बी-बियाणे, मेट्रोमोनी या प्रकाराद्वारे नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कारवाईत पुढे आली आहे.

वेगळी राज्ये अन् वेगळी फसवणूक 
राजस्थानमधील - ऑनलाइन वस्तू खरेदी-विक्री करण्याच्या बहाण्याने फसवणूक 
बिहार, झारखंड - नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक 
दिल्ली, उत्तर प्रदेश - कॉल सेंटर थाटून नोकरी, कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक 
ऑनलाइन फसवणूक होण्याची कारणे
हिंदी भाषेवरील प्रभुत्वामुळे फोनवरील व्यक्ती सरकारी अधिकारीच वाटणे
अनोळखी व्यक्तीवर तत्काळ विश्‍वास ठेवणे
फोन किंवा सोशल मीडियाद्वारे संपर्क करणाऱ्यांना तत्काळ प्रतिसाद देणे  

आत्तापर्यंत नोकरी, कर्ज, लग्न, क्रेडिट-डेबिट कार्ड, लॉटरी, क्विकर, ओएलक्‍स अशा माध्यमांतून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांतील गुन्हेगारांकडून सातत्याने होत आहेत. 
- राधिका फडके, पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा.

सायबर पोलिस ठाणे 
वर्ष    दाखल गुन्हे    अटक केलेले आरोपी
२०१६    १७२    ८७
२०१७    २१४    ९०
२०१८    १७५    १००
२०१९    ४८    ८९   

Web Title: Criminals in UP and Bihar action from the North of Cyber Criminals

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com