रात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर तुरुंगात जाल

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

पुणे : पुणेकरांनो, दिवाळीत तुम्ही रात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर सणासुदीच्या काळात तुरुंगामध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. कारण, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा सर्व यंत्रणा सोमवारपासून (ता. 5) सक्रिय होणार आहेत. 

पुणे : पुणेकरांनो, दिवाळीत तुम्ही रात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर सणासुदीच्या काळात तुरुंगामध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. कारण, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा सर्व यंत्रणा सोमवारपासून (ता. 5) सक्रिय होणार आहेत. 

#CrackersIssue 
हवेतील प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यात दिवाळीतील फटाक्‍यांमुळे हवेबरोबरच ध्वनिप्रदूषणात भर पडते. याला रोखण्यासाठी कमी आवाजाचे फटाके रात्री आठ ते दहा या वेळेतच फोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. 

...अशी होणार देखरेख 
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दिवाळीच्या तीन दिवसांमध्ये शहरातील विविध 15 ठिकाणी हवा आणि ध्वनिप्रदूषणाची गुणवत्ता मोजणार आहे. त्याची यंत्रणा सज्ज केली आहे. याचे विश्‍लेषण केलेले मंडळाचे अहवाल न्यायालयामध्ये पुरावे म्हणून वापरतात. 

सर्व पोलिस ठाण्यांना आदेश 
शोभेच्या दारूच्या आतषबाजीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना दिल्याची माहिती शहर पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिली. बीट मार्शल, गस्तीवरील पोलिस पथकेही याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहेत. रात्री आठ ते दहादरम्यान 125 डेसिबलपेक्षा कमी आवाजाचे फटाके उडवायचे आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. प्रसंगी त्यांना अटकही होऊ शकते, असे सेनगावकर यांनी नमूद केले. 

रस्त्यावर फटाके विक्रीस बंदी 
शहर आणि उपनगरात कोठेही रस्त्यांवर फटाके विक्रीच्या स्टॉल्सला परवानगी दिलेली नाही, असे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. रस्त्यावर बेकायदा स्टॉल्स आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी खुली मैदाने आणि नदीपात्रातच महापालिकेने फटाके विक्रीच्या स्टॉल्सला परवानगी दिली आहे. त्या व्यतिरिक्त रस्त्यावर स्टॉल्स नसतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सर्वोच्च न्यायालयाने फटाक्‍यांबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. प्रसंगी त्यांच्यावर अटकेचीही कारवाई होईल. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखावा, असे आवाहन नागरिकांना केले आहे. 
- के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे शहर 

दिवाळीत तीन दिवसांमध्ये शहरातील 15 ठिकाणी दिवसातून तीन वेळा हवेची गुणवत्ता मोजणार आहे. त्यातून या दरम्यान फटाक्‍यांचा आवाज आणि त्यातून होणारे ध्वनिप्रदूषण याची सविस्तर माहिती मिळणार आहे. 
- डॉ. हेरंबप्रसाद गंधे, प्रादेशिक अधिकारी, पुणे विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ 

खरंतर फटाक्‍यांमुळे हवा आणि ध्वनिप्रदूषण होते. त्याचबरोबर लहान मुले, वृद्धांसह रुग्णांना ध्वनिप्रदूषणाला सामोरे जावे लागते. त्यामुळे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून सर्वांनीच प्रदूषण टाळण्यास हातभार लावावा. त्याऐवजी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने गरजूंना मदत करावी. 
- स्मिता शेवाळे, अभिनेत्री 

WEBTITLE  : marathi news pune firecrackers supreme court pune city police 


संबंधित बातम्या

Saam TV Live