सोशल मीडियावर व्हायरल झालेली आजींची पोस्ट चंद्रपुरापर्यंत पोहचली अन्...

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 ऑगस्ट 2018

 मुलाशी भांडण झालेल्या ७० वर्षीय आजींनी रागारागात घर सोडले. कुठे देवळाचा आधार तर कुठे धुणीभांडी करीत साडेतीन वर्षे काढली. मात्र आजारी पडल्याने त्यांना कोणीतरी ससून रुग्णालयात दाखल केले.

वृद्धापकाळाने दोन मुलांचा पत्ता आठवेना. अखेर पुण्यातून सोशल मीडियावर व्हायरल झालेली आजींची पोस्ट चंद्रपुरापर्यंत पोचली आणि चार वर्षांनी त्यांचा मुलगा रुपीनगरच्या किनारा वृद्धाश्रमात त्यांना घरी  नेण्यासाठी आला. मुलगा आणि नातवाला पाहून आजीचा आनंद गगनात मावेनासा झाला.

नागरबाई अर्जुन बागल असे आजीचे नाव आहे. १ जुलै २०१८ रोजी आजी ससून रुग्णालयातून रुपीनगर, तळवडे येथील किनारा वृद्धाश्रमात दाखल झाल्या. आजींना दोन मुले आहेत. मात्र ते कुठे राहतात, हे आठवत नव्हते. एक दिवस आजींना आपला एक मुलगा बार्शीला राहत असल्याचे आठवले. मुलांच्या शोधासाठी किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रीती वैद्य, मोटारचालक प्रभाकर ढोले यांनी बार्शी गाठली. 

आजीच्या मुलाचे घर सापडले. आजीला आसपासच्या लोकांनी ओळखले. मात्र त्या मुलाने काही वर्षांपूर्वी बार्शीतील घर सोडल्याने त्या पुन्हा वृद्धाश्रमात आल्या. त्यानंतर वैद्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून आजीच्या मुलांना शोधण्याचे आवाहन केले. निगडी येथे राहणाऱ्या सुधीर कारंडे यांनीही आजीच्या मुलाला शोधासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत आजींची पोस्ट व्हॉट्‌सॲप, फेसबुकच्या अनेक ग्रुपवर टाकली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. सोशल मीडियावरील पोस्ट वाचून चंद्रपूरहून आजीचा मुलगा आणि नातू त्यांना घेण्यासाठी आले. मुलगा आणि नातवाला पाहून आजीचा आनंद गगनात मावेनासा झाला. आजी वृद्धाश्रमातील प्रत्येक सदस्याला माझा मुलगा आणि नातू न्यायला आल्याचे सांगत होत्या. मुलाला जवळ घेत ‘‘आता मी तुला सोडून कोठेही कधीच निघून जाणार नाही. मी रागाने घर सोडले, मला क्षमा कर,’’ असे म्हणत अश्रूंना वाट करून दिली.

‘‘आईचा खूप शोध घेतला. ती जिवंत आहे की नाही याबाबतही शाश्‍वती नव्हती. त्यामुळे शोध घेण्याचे सोडून दिले. किनाराने आईला चांगले सांभाळले, यामुळे मी त्यांचा आभारी आहे,’’ अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने व्यक्‍त केली. सर्व सहकाऱ्यांचा निरोप घेत आजी आपला नातू आणि मुलासह चंद्रपूरला रवाना झाल्या.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live