महाराष्ट्रात ११ जूनपर्यंत वरूणराजाचं आगमन

महाराष्ट्रात ११ जूनपर्यंत वरूणराजाचं आगमन

पुणे -  दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात ११ जूनपर्यंत नैॡत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) सरी बरसतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. मॉन्सून सहा जूनला केरळमध्ये दाखल होणार असला तरीही सर्वसाधारणच्या तुलनेत चार ते पाच दिवस हा मॉन्सून उशिरा दाखल होत आहे. 

यंदा देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे. राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने बहुतांश भागांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे. याबाबत ‘सकाळ’शी बोलताना वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. पै म्हणाले, ‘‘हिंदी महासागरात मॉन्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे, त्यामुळे येत्या शनिवार (ता. १८) आणि रविवारपर्यंत (ता. १९) अंदमान आणि निकोबार बेटाच्या दक्षिणेकडील भागात मॉन्सून स्थिरावेल. मॉन्सून २३ मेपर्यंत संपूर्ण अंदमान आणि निकोबारचा परिसर व्यापेल. सामान्यतः २० मेपर्यंत मॉन्सून संपूर्ण अंदमान व्यापतो. यंदा मात्र त्यासाठी दोन ते तीन दिवस उशीर होणार आहे. त्यानंतर केरळपर्यंतचा प्रवास मॉन्सून सहा जूनपर्यंत पूर्ण करेल. सर्वसाधारणपणे एक जूनला मॉन्सून केरळमध्ये दाखल होतो. यंदा मात्र तो पाच दिवस उशिरा दाखल होण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात ५ ते १० जूनच्या दरम्यान मॉन्सून दाखल होतो. तळकोकणात त्याच्या पहिल्या सरी पडतात. या वर्षी केरळातच उशिरा दाखल होत असल्याने महाराष्ट्रातही तो सर्वसाधारण तारखेच्या उशिरा दाखल होणार आहे.’’

भारतीय हवामान खात्याने विकसित केलेल्या सांख्यिकी प्रारूपाच्या आधारावर हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात दिलेल्या तारखांच्या चार दिवस पुढे-मागे मॉन्सून दाखल होऊ शकतो, असेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

मॉन्सून देशाच्या दक्षिण भागात उशिरा दाखल होत असला तरीही त्यानंतर त्याच्या प्रगतीचा वेग वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास तो लवकर पूर्ण करेल, असे पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्‍यता असल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

‘एल निनो’चा प्रभाव नाही
प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याच्या प्रवाहाचा (एल निनो) परिणाम मॉन्सूनच्या प्रगतीवर होत असल्याचा दावा काही हवामान तज्ज्ञ करतात. त्यामुळे याचीही नोंद मॉन्सूनच्या प्रगतीसाठी केली जाते. सद्यःस्थितीत ‘एल निनो’ सक्रिय नाही, त्यामुळे मॉन्सूनच्या सुरवातीला ‘एल निनो’चा प्रभाव राहणार नाही, असेही डॉ. पै यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Indian Meteorological Department predicts monsoon till 11 June

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com