पुणे येथे लोकसभेत भाजपचा दणदणीत विजय, विधानसभेत काय होणार ?

पुणे येथे लोकसभेत भाजपचा दणदणीत विजय, विधानसभेत काय होणार ?

पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे. २०१४ मध्ये खासदार झालेल्या अनिल शिरोळे यांच्याऐवजी भाजपने यंदा गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. बापट यांनीही पक्षाची अपेक्षापूर्ती करत दणदणीत विजय मिळविला.

बापट यांच्या विजयामध्ये पुण्यातीत विधानसभा मतदारसंघनिहाय भाजपची कामगिरी कशी झाली, यावर एक नजर टाकली, की आगामी विधानसभेत पुण्यात काय होईल, याची झलक दिसू शकते.

बालेकिल्ल्यात दिमाख वाढला
बालेकिल्ल्यात म्हणजेच कोथरूडमध्ये भाजप-शिवसेनेने आपला प्रभाव दिमाखात टिकविला आणि वाढविलाही! कोथरूडकरांनी भाजपचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांना १ लाख ७ हजार १९६ इतके मताधिक्‍य दिले आणि एवढ्या मताधिक्‍याचा आत्मविश्‍वास असलेल्या इथल्या नेत्यांचा ‘शब्द’ खरा ठरला. एकमेकांना अडविण्यात गुंतणाऱ्या नेत्यांनी बापट यांच्यासाठी ताकद वापरल्याने कोथरूडकरांच्या मतांचे आकडे पुरेसे बोलके ठरले.  

या मतदारसंघात काँग्रेसचे मोहन जोशी यांना ४२ हजार ३७४ मते मिळाली. बहुजन वंचित आघाडीचे अनिल जाधव यांनी साडेचार मते घेऊन काँग्रेसच्या मतांचे अर्धशतक रोखले. निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र आली. हा एकोपा विधानसभा निवडणुकीतही कायम राहणार असल्याने नेतृत्वाने जाहीर केल्याने इच्छुकांच्या पोटात गोळा आला. पक्षांतर्गत विरोधकांसह युतीतील विरोधकही बापटांसाठी झटले आणि त्याचा परिणाम मताधिक्‍क्‍यातून दिसून आला. 

प्रस्थापित सरकारांविरोधातील जनमताच्या बळावर मते मिळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. त्यासाठी ‘राष्ट्रवादी’ने मोर्चेबांधणीही केली होती; परंतु भाजपच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व वाढविण्यात दोन्ही काँग्रेसला यश आले नाही. या निवडणुकीतील मिळालेल्या मतांची आकडेमोड करीत आतापासून विधानसभेचे गणित मांडले जात आहे. भाजपचे मताधिक्‍य पाहता, या मतदारसंघात विधानसभेसाठी युतीकडून इच्छुकांची संख्या वाढणार आहे. शिवसेना जागावाटपात हक्काचा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करील. त्यामुळे आधी जागावाटपाचे गणित सोडविण्याचे आव्हान युतीच्या नेतृत्वापुढे आता असणार आहे. 

मिळालेली मते
  गिरीश बापट (भाजप) - १,४८,५७०
  मोहन जोशी (काँग्रेस) - ४२,३७४
  अनिल जाधव (वंचित बहुजन आघाडी) - ४,४७०
  मताधिक्य - १,०६,१९६

भाजपसाठी गरज चिंता अन् चिंतनाची...
भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना मताधिक्‍य देण्यात राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा मतदारसंघ फेल ठरला आहे. आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते. असे असताना या मतदारसंघाने जेमतेम मताधिक्‍य दिल्याने आगामी निवडणूक कांबळे यांच्यासाठी चुरशीची राहणार; तर वंचित बहुजन आघाडीकडे जाणारी मते रोखण्यात अपयश आल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसला.

गेल्या निवडणुकीत येथील मतदार भाजपमागे उभे राहिले. यंदा मात्र चित्र वेगळे राहील, असा दावा काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात होता. त्यामुळे खरी लढत राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यातच होती. पक्षाच्या उमेदवाराला कोण मताधिक्‍य मिळवून देणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. 

गेल्या निवडणुकीत या मतदारसंघाने अनिल शिरोळे यांना चौदा हजारांचे मताधिक्‍य दिले होते. बापट यांना सुमारे बारा हजारांचे मताधिक्‍य या मतदारसंघातून मिळाले. दुरंगी लढत असतानाही पक्षाच्या उमेदवाराला सर्वांधिक मताधिक्‍य देणे कांबळे यांना शक्‍य झाले नाही; तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांना जाणारी मते रोखून ती काँग्रेसकडे वळविण्यात बागवे यांना अपयश आले. एकूणच काय तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने आगामी निवडणूक ही पक्षाच्या दृष्टीने कसोटीची ठरणारी आहे.

मिळालेली मते 
  गिरीश बापट (भाजप) - ६७,१७७
  मोहन जोशी (काँग्रेस) - ५४,४४४
  अनिल जाधव (वंचित बहुजन आघाडी) - १४,६९९
  मताधिक्य - १२,७३३

सलग दुसऱ्यांदा भाजपला साथ
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाने सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिली. भाजपचे गिरीश बापट यांना २९ हजार ५३२ मतांचे मताधिक्‍य दिले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने यंदा दहा हजार मते गमावली. पक्षाला त्याची मोठी किंमत विधानसभा निवडणुकीत मोजावी लागण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस उमेदवाराला यंदा दहा हजार मते जादा मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीनेही ११ हजारांहून अधिक मते मिळवून अस्तित्व दाखवून दिले.   

मतदारसंघाने भाजपचे अनिल शिरोळे यांना खासदार, तर विजय काळे यांना आमदार केले. महापालिका निवडणुकीत १३ नगरसेवक दिले. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने मोठे कष्ट घेतले नाही. ‘पक्षाने गृहीत धरले’ अशी भावना मतदारांमध्ये होती.  

काँग्रेसने उमेदवारीच्या घोषणेस विलंब केला. त्याचा परिणाम जोशींच्या प्रचारावर झाला. एकाही वरिष्ठ काँग्रेस नेत्याची सभा झाली नाही. मतदार यादीतील गोंधळाने अनेकांना मतदानापासून वंचित ठेवले. निरुत्साही कार्यकर्त्यांनीही मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न केला नाही. यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार विश्‍वजित कदम (३९ हजार १४१) यांच्यापेक्षा जोशी यांना दहा हजार जास्त मते मिळाली.

वंचित बहुजन आघाडीच्या अनिल जाधव यांना दलित, मुस्लिम, बहुजन मतदारांनी साथ दिली. आता विधानसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविणार आहेत.

मिळालेली मते 
  गिरीश बापट (भाजप) - ७७,९८२
  मोहन जोशी (काँग्रेस) - ४८,४५०
  अनिल जाधव (वंचित बहुजन आघाडी) - ११,३७६
  गिरीश बापट यांना मिळालेले मताधिक्‍य - २९,५३२

वजनदार नेत्यांची भरघोस मदत
आमदार माधुरी मिसाळ, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे व सभागृह नेते श्रीनाथ भिमाले या भाजपच्या वजनदार नेत्यांचे प्राबल्य असणाऱ्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपला यंदाही भरघोस मतदान झाले. कोथरूडच्या खालोखाल गिरीश बापट यांना या मतदारसंघातून मतदान झाले.

शहरातील विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मताधिक्‍य देणारा हा मतदारसंघ आहे. यातून पुण्यातील सर्वाधिक ६९ हजार मतांच्या फरकाने आमदार माधुरी मिसाळ निवडून आल्या. त्यानंतर २०१७ मध्ये शहरातून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक महापालिकेत पाठविणारा हा मतदारसंघ आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाकडे भाजपचे लक्ष लागले होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ५२.०७ टक्के मतदानाची नोंद झाली. परिसरात सोसायट्यांबरोबर झोपडपट्टीचाही भाग आहे.

सोसायट्यांमधील मतदारांची संख्या मोठी आहे. या मतदारांनी भाजपला कौल दिला. दुसरीकडे काँग्रेसची प्रचार यंत्रणा या भागात सक्षमपणे राबविण्यात आल्याचे दिसले नाही. त्यामुळे पक्षातर्फे राष्ट्रीय पातळीवर मांडले जाणारे मुद्दे मतदारांना पटवून देण्यात कार्यकर्त्यांना यश मिळाले नाही. त्यातून साक्षर आणि उच्च मध्यम वर्गीय मतदार भाजपकडे वळाला आणि या मतदारसंघातून भाजपला मताधिक्‍य देण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसला ३७ हजार ८७७ मते मिळाली होती. त्या तुलनेत यंदा काँग्रेसला १२ हजार ६९० मते जास्त मिळाली आहेत.

मिळालेली मते
  गिरीश बापट (भाजप)  - १, १६, ८९९
  मोहन जोशी (काँग्रेस ) - ५०, ५६७
  अनिल जाधव (वंचित बहुजन आघाडी) - १०,६३४
  भाजपचे मताधिक्‍य -  ६६, ३३२

होम पीचवरच रनरेट मायनस
विद्यमान आमदार असल्याने ‘होम पीच’ आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातून गिरीश बापट यांना सर्वाधिक मताधिक्‍य मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना ५२ हजार ३९१चे मताधिक्‍य मिळाले. 

२०१४ च्या निवडणुकीत अनिल शिरोळे यांना ५८ हजार ५३०चे मताधिक्‍य मिळाले होते. मतदारांची संख्या वाढलेली असताना शिरोळे यांच्या तुलनेत बापट यांचे मताधिक्‍य ६ हजार ३९१ने घटले. पहिल्याच फेरीत बापट यांना ४ हजार ९२६, तर मोहन जोशी यांना दोन हजार ८५४ मते मिळाली. त्यानंतर प्रत्येक फेरीत बापट यांना किमान पाच हजारांचे मताधिक्‍य मिळत गेले.

बापट यांना होम ग्राउंडवर खाली खेचण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती काहीशी यशस्वी झाल्याचे आकडेवारीतून दिसते; परंतु बापट यांचा कसब्याशी असलेला घरोबा तोडण्यात त्यांना अपयश आले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे रवींद्र धंगेकर आणि काँग्रेसचे रोहित टिळक यांनी चांगली लढत दिली होती. त्यामुळे बापट यांना कसब्यातून किती मताधिक्‍य मिळणार, याचे औत्सुक्‍य होते. दरम्यान, बापट खासदार झाल्यामुळे कसब्यातून विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे. येथून इच्छुकांची यादीदेखील मोठी आहे. अनेक इच्छुकांनी बापट यांना दिल्लीत पाठविण्यासाठी जोमात काम केले होते. 

मिळालेली मते 
  गिरीश बापट (भाजप) - १,०३,५८३                       
  मोहन जोशी  (काँग्रेस)  - ५१,१९२                 
  अनिल जाधव (वंचित बहुजन आघाडी) - २,४७१ 
  गिरीश बापट यांना मिळालेले मताधिक्‍य - ५२,३९१

काँग्रेसला हात दाखवीत विजयाला मोठा हातभार 
एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड असणाऱ्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाने यंदाही काँग्रेसला ‘हात’ दाखविला असून मताधिक्‍य देऊन भाजपच्या विजयाला हातभार लावला. वंचित बहुजन विकास आघाडीकडे जाणारी मते काँग्रेस आघाडीला रोखता आली नाहीत. वंचितच्या उमेदवाराला पुण्यातून सर्वाधिक मते येथे मिळाली. 

मतदारसंघात सर्वाधिक ४ लाख ४४ हजार २५२ मतदार आहेत. येथे दोन लाख सहा हजार जणांनी मतदान केले. २०१२ मध्ये भाजपचा एक नगरसेवक तर २०१७ मध्ये १४ नगरसेवक निवडून आले. स्थायीचे अध्यक्षपद व आमदारपद एकाच घरात असल्याने या भागात मोठा निधी गेला. त्याचा फायदा भाजपला झाला. प्रत्येक बूथवरील यंत्रणा ही भाजपची जमेची बाजू ठरली. तर काँग्रेस, राष्ट्रवादीत समन्वय नसल्याने काँग्रेस उमेदवाराला कमी मते पडली. त्याचा फायदा वंचितच्या उमेदवाराने उठवला. झोपडपट्टी भागातील मतदान केंद्रांतून वंचिला एक हजारपेक्षा जास्त मतदान झाले. 

वडगाव शेरीत २०१४ मध्ये भाजपला ४२ हजार ४०४ मतांची बढत मिळाली होती. महापालिका निवडणुकीनंतर भाजपची ताकद वाढली. यंदा १४ हजार ४१७ ने वाढ होऊन ५६ हजार ८२१ ची बढत मिळाली. शिवसेनेने विधानसभेसाठी वडगाव शेरीची मागणी केली आहे. मताधिक्‍यामुळे भाजप आता तो सोडणे अशक्‍य आहे. 

मिळालेली मते
  गिरीश बापट (भाजप) - १, १७,६६४
  मोहन जोशी (काँग्रेस) - ६०, ८४३
  अनिल जाधव (वंबआ) - २१,०८४ 
  मताधिक्‍य - ५६,८२१ 

Web Title: Loksabha Election Results BJP Vidhansabha 2019 Politics

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com