आता बुरशीपासून औषध, पुण्यातील संशोधकांची किमया

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 जून 2019

पुणे - कर्करोग, अस्थमा, ज्वर, खोकला, ब्राँकायटिस आदी आजारांवरील औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘सिट्राल’ या रासायनिक पदार्थाची बुरशीपासून निर्मिती करण्यात संशोधकांना यश आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाच्या मोसमा नदीम शेख आणि डॉ. दिगंबर मोकाट यांनी हे संशोधन केले आहे. नुकताच त्यांचा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ एसेन्शिअल ऑइल बेअरिंग प्लांट’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित झाला आहे.

विविध औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘सिट्राल’चे कृत्रिमरीत्या उत्पादन घेतले जाते. बाजारात त्याला मोठी किंमत आहे. आता संशोधकांनी ‘ट्रायकोडर्मा व्हेरीडीन’ या बुरशीपासून ‘सिट्राल’ची निर्मिती केली आहे. शेख म्हणाल्या, ‘‘आजपर्यंत फक्त कृत्रिमरीत्या ‘सिट्राल’चे उत्पादन घेतले जात होते. पण, आमच्या संशोधनामुळे बुरशीच्या वापरातून गवती चहामधून १२ टक्के अधिक सिट्राल प्राप्त करणे शक्‍य झाले आहे. एवढेच नाही, तर याच बुरशीमुळे गवती चहा आणि पुदिना यांच्या उत्पादनातही वाढ करता येऊ शकते.’’

नैसर्गिकरीत्या सिट्राल हा घटक ‘गवती चहा’मध्ये आढळतो. जगभरामध्ये दरवर्षी ६०० टन एवढे गवती चहाचे उत्पादन घेतले जाते. त्यातील ८० टक्के उत्पादन एकट्या भारतात होते. केरळ, कर्नाटकसह पश्‍चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी याची शेती केली जाते. रासायनिक खते, पीएसबी कल्चर, गांडूळ खत यापेक्षा ‘ट्रायकोडर्मा व्हेरीडीन’ ही बुरशी जास्त उत्पादन देत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खत म्हणूनही या बुरशीचा प्रभावीरीत्या वापर करता येईल. या बुरशीच्या वापरातून पुदिन्यातील ‘मेंथॉल’ या घटकाच्या उत्पादनात ४.८ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

औषधी उपयोग
    कर्करोग प्रतिबंधक
    अस्थमा, दमा, ब्रॉन्कायटीस
    ‘अ’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या 

व्यावसायिक उपयोग
 सुगंधी द्रव्ये
 शाम्पू, दंतमंजन
 साबण आणि इतर सौंदर्यप्रसाधने

सिट्राल बुरशीपासून प्राप्त करण्याची पद्धत
‘जीसीएमएस’ पद्धतीने ओळख पटवून बुरशी वेगळ्या केल्या जातात - ‘ट्रायकोडर्मा व्हेरीडीन’ या बुरशीतून ‘पोटॅटो डेक्‍सटॉर्स - हायड्रो डिस्टिलेशन’ पद्धतीने ‘सिट्राल’ विलग करण्यात येते.

पुदिन्यातील मेंथॉल आणि गवती चहातील सिट्राल यांच्या उत्पादनवाढीसाठी ‘ट्रायकोडर्मा व्हेरीडीन’ ही बुरशी उत्तम खत म्हणून उपयोगात आणता येते. संशोधनाचा शेतकऱ्यांना थेट फायदा व्हावा म्हणून या बुरशीचे ‘कल्चर’ उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे.
- डॉ. दिगंबर मोकाट, वनस्पतिशास्त्र विभाग

Web Title: Medicine making by Fungi Research Success

संबंधित बातम्या

Saam TV Live