पुणे मेट्रो घावणार विमानतळापर्यंत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 जून 2019

त्रुटी दूर करून अहवाल | केंद्र सरकारच्या शहर विकास विभागाकडून काही अहवालात सुधारणा सुचविल्या होत्या. त्या सुधारणा करून अहवाल गेल्याच महिन्यात पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये भविष्यातील गरज लक्षात घेऊन हडपसर ते पुरंदर विमानतळ यादरम्यान मेट्रो मार्गदेखील नव्याने प्रस्तावित करण्यात आल्याचे पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पुणे - भविष्यातील गरज लक्षात घेऊन हडपसरपासून पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रो मार्ग पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सर्वंकष वाहतूक आराखड्यात (सीएमपी) प्रस्तावित केला आहे. या मार्गाची लांबी सुमारे ३३ किलोमीटर आहे. केंद्र सरकारच्या शहर विकास विभागाकडे (मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंट) पाठविलेल्या सुधारित अहवालात या मार्गाचा नव्याने समावेश केला आहे.

‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ तयार करण्याचे काम पीएमआरडीएने ‘एल अँड टी’ या कंपनीला यापूर्वी दिले आहे. या कंपनीने पहिल्या टप्प्यात दोन हजार चौरस किलोमीटरच्या परिसरातील वाहतुकीचा अभ्यास करून पीएमआरडीएला आराखडा सादर केला होता. तो तयार करताना रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन त्यामध्ये मेट्रो प्रकल्पासह अनेक नवीन प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. पहिल्या टप्प्यात अशा सुमारे ६६ हजार कोटी रुपयांच्या योजना प्रस्तावित केल्या आहेत.

पीएमआरडीएकडून सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर यादरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. भविष्यातील गरज लक्षात  घेऊन हा मार्ग हडपसरपर्यंत वाढविणे, पुणे महापालिकेने हाती घेतलेला वनाज ते रामवाडी मेट्रो प्रकल्प वाघोलीपर्यंत नेणे, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्ग हडपसरपर्यंत वाढविणे याशिवाय सहा ते आठ नवीन मेट्रो मार्ग या अहवालात नव्याने सुचविण्यात आले आहेत. हा अहवाल पीएमआरडीएकडून केंद्र सरकारच्या शहर विकास विभागाकडे अंतिम मान्यतेसाठी गेल्या नोव्हेंबर महिन्यात पाठविण्यात आला होता. या विभागाने त्यात काही त्रुटी काढून सुधारित अहवाल पाठविण्याच्या सूचना पीएमआरडीएला केल्या होत्या. त्या त्रुटी दूर करून हडपसर ते पुरंदर विमानतळ यादरम्यान मेट्रो मार्गाचा समावेश त्यामध्ये नव्याने केल्याचे एल अँड टी कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

त्रुटी दूर करून अहवाल
केंद्र सरकारच्या शहर विकास विभागाकडून काही अहवालात सुधारणा सुचविल्या होत्या. त्या सुधारणा करून अहवाल गेल्याच महिन्यात पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये भविष्यातील गरज लक्षात घेऊन हडपसर ते पुरंदर विमानतळ यादरम्यान मेट्रो मार्गदेखील नव्याने प्रस्तावित करण्यात आल्याचे पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live