पुण्यातील मुठा नदीचे प्रदूषण आता कमी होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 जून 2019

पुणे - शहरातून वाहणारी मुठा ही तुम्हाला खरंच नदी वाटते, हा स्वाभाविक प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात येतो. कारण यातून फक्त सांडपाणीच वाहते. हे आपल्या अंगवळणी पडलेय. पण, हे चित्र बदलण्याची भीष्मप्रतिज्ञा महापालिकेने केलीय. नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा (एसटीपी) ५२ महिन्यांमध्ये सक्रिय करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाचे आहे.

पुणे - शहरातून वाहणारी मुठा ही तुम्हाला खरंच नदी वाटते, हा स्वाभाविक प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात येतो. कारण यातून फक्त सांडपाणीच वाहते. हे आपल्या अंगवळणी पडलेय. पण, हे चित्र बदलण्याची भीष्मप्रतिज्ञा महापालिकेने केलीय. नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा (एसटीपी) ५२ महिन्यांमध्ये सक्रिय करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाचे आहे.

शहरातील नदीच्या प्रवाहातून पाणी वाहत नाहीच, वाहते ते सांडपाणीच, हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी नदीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेल्या पाणी तपासणीतून अधोरेखित झालेय. खरेतर आपल्या मुठा नदीच्या काठावर कोणताही औद्यागिक कारखाना नाही, की उद्योग क्षेत्रही नाही; पण नदीचे प्रदूषण होत आहे, त्याचे मुख्य कारण हेच आहे, की आपण आपले सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडत आहोत.

हे प्रदूषण कमी करण्यासाठी शहराला हवी आहेत, सांडपाणी प्रक्रिया करणारी २० केंद्रे (एसटीपी). पण, शहरात सध्या १० पैकी ९ ‘एसटीपी’ कार्यान्वित आहेत. त्यात आता आणखी ११ ‘एसटीपी’ची भर पडणार आहे. ऑक्‍टोबर २०२२ पर्यंत हे ‘एसटीपी’ कार्यान्वित होतील, असे नियोजन महापालिकेने केले आहे.

इथे झालेय सर्वाधिक प्रदूषण
खडकवासल्यापासून सुरू झालेला मुठेचा १६ किलोमीटर प्रवाह प्रदूषित झाला आहे. नांदेड सिटी, वडगाव बुद्रुक, आनंदनगर, शिवणे, वारजे, कोथरूड, विठ्ठलवाडी, शिवाजीनगर या भागात प्रदूषणाची पातळी कमालाची दिसते.  

नदीचे आरोग्य (खडकवासला ते शिवाजीनगर दरम्यान)
- बायोकेमिकल ऑक्‍सिजन डीमांड - ३२ ते ३६ ग्रॅम प्रतिलिटर 
- केमिकल ऑक्‍सिजन डीमांड - ९२ ते १०४ ग्रॅम प्रतिलिटर
- वास - सांडपाण्याची दुर्गंधी

पुण्यातून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचे प्रदूषण कमी करण्यास प्राधान्य दिले आहे, त्यासाठी महापालिकेकडून तातडीने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प कार्यान्वित करण्याचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. नदीचे आरोग्य सुधारावे यासाठी महापालिकेने २०२२ पर्यंतचे नियोजन केले आहे.
- दिलीप खेडकर, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

सांडपाणी नदीत सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करणारे ११ नवीन ‘एसटीपी’ उभारले जात आहेत, त्यापैकी सहा केंद्रांची निविदा काढली आहे. हे सर्व प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्यातून ३९६ ‘एमएलडी’ सांडपाण्यावर प्रक्रिया करता येईल. पुढील चार वर्षांमध्ये हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत.
- मदन अधारी, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा, पुणे महापालिका

Web Title: Mutha River Water Pollution Changes Development


संबंधित बातम्या

Saam TV Live