शालेय विद्यार्थ्यांच्या गाड्यांना आता शाळांबाहेरच ‘ब्रेक’

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जून 2019

पुणे - सुसाट वाहने चालवीत शाळा गाठणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या  गाड्यांना आता शाळांबाहेरच ‘ब्रेक’ लागण्याची शक्‍यता आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी वाहने आणल्यास त्याची जबाबदारी शाळांवरच ठेवून त्यांच्यावर वाहतूक शाखेकडून कारवाईची छडी उगारली जाणार आहे. 

पुणे - सुसाट वाहने चालवीत शाळा गाठणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या  गाड्यांना आता शाळांबाहेरच ‘ब्रेक’ लागण्याची शक्‍यता आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी वाहने आणल्यास त्याची जबाबदारी शाळांवरच ठेवून त्यांच्यावर वाहतूक शाखेकडून कारवाईची छडी उगारली जाणार आहे. 

वाहतूक पोलिसांकडून शहरात दररोज राबविल्या जाणाऱ्या विशेष मोहिमांबरोबरच कारवाईमध्ये अल्पवयीन मुले दुचाकी, चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात चालवताना आढळत असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये बहुतांश मुले शाळा, खासगी शिकवणी, विविध प्रकारचे खेळ, कार्यशाळांना जाण्यासाठी वाहने वापरतात. विशेषतः पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने वापरण्यास विरोध करण्याऐवजी तेच स्वतः मुलांच्या हाती वाहने सोपवीत आहेत. परिणामी, अल्पवयीन मुले त्यांच्याकडील वाहने भरधाव चालविणे, स्टंटबाजी करणे, विचित्र पद्धतीने गाडी चालवून इतरांच्या जिवास धोका पोचविणे, एका गाडीवर तिघे प्रवास करणे यांसारखे प्रकार करतात. 

मागील वर्षी झालेल्या अपघातांमध्ये ठार झालेल्यांमध्ये १८ अल्पवयीन मुलांचा समावेश होता. यातील पाच मुली होत्या. मागील चार महिन्यांत तीन अल्पवयीन मुलांना अपघातात जीव गमावावा लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर अल्पवयीन मुलांकडून वाहनांचा वापर होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडून शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रबोधन केले जाते. असे असतानाही शाळांमध्ये वाहने घेऊन येणाऱ्या अल्पवयीन मुलांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे अशा शाळांची पाहणी करून संबंधित शाळांना वाहतूक शाखेकडून नोटीस बजावली जाणार आहे. त्यानंतरही हेच चित्र कायम राहिल्यास संबंधित शाळांवर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. शहरातील बहुतांश शाळा  १७ जूनपासून सुरू होतील, त्यादृष्टीने वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी शहरातील सर्व शाळांना याबाबतचे पत्र पाठविले आहे. 

अल्पवयीन मुलांकडून वाहने चालविण्यामुळे त्यांच्यासह इतरांच्याही जिवास धोका निर्माण होतो. त्यामुळे मुलांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अल्पवयीन मुलांनी शाळांमध्ये वाहने आणल्यास संबंधित शाळांना जबाबदार धरले जाईल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 
- पंकज देशमुख,  पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

Web Title: No entry for childrens vehicles in schools


संबंधित बातम्या

Saam TV Live